हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयाची मान्यता रद्द करा

0

रुग्ण हक्क परिषदेची मागणी : रुग्णाला डांबल्याचा प्रकार

हडपसर : बिलाअभावी वयोवृध्द हृदयरोग रुग्णाला डांबल्याचा प्रकार हडपसरमधील नामांकीत अशा सह्याद्री रुग्णालयात नुकताच घडला. रुग्ण हक्क परिषदेने आंदोलन करून रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या एका गरीब नागरिकाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला मुलगी व जावयाने हडपसरमधील सहयाद्री रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी सुरुवातीला 1 लाख 80 हजार रुपये खर्च शस्त्रक्रिया करण्यासाठी लागतील, असे सांगितले गेले. रुग्ण दारिद्रय रेषेखाली असल्याने महात्मा फुले आरोग्य योजनेच्या नावाखाली गरजू रुग्णांना शासकीय अनुदान उपचारासाठी उपलब्ध करून देते. त्या योजेनंतर्गत नातेवाईकांनी रुग्णास सह्याद्री रुग्णालयात भरती केले. ऑपरेशन झाल्यानंतर मात्र रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे हजारो रुपयांची अतिरिक्त मागणी करून रुग्णास डिस्चार्ज देण्यास नकार दिला. या अन्यायाविरोधात रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने हॉस्पिटलच्या गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयावर अपहरणाचा गुन्हा दाखल करा, हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची मागणी अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी यावेळी केली. पत्रकार रुग्णालयात आल्यावर सह्याद्री हॉस्पिटलचे व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी सुरक्षारक्षकास पत्रकारांना अडविण्यास सांगितले. कर्मचार्‍यांनाही गायकवाड नीट वागणूक देत नसल्याचे कर्मचार्‍यांनी खासगीत सांगितले.