हडपसरला जादा पाणी नाही

0

पालिकेचा खुलासा : भामा- आसखेड पूर्ण होईपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

पुणे – महापालिकेडून हडपसर परिसराला लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पातून क्षमतेपेक्षा जास्त पाणी वापर केला जात आहे. त्यापेक्षा जास्त पाणी हडपसरला पाणी देता येणार नाही, असा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला. त्यामुळे भामा-आसखेड योजना पूर्ण होईपर्यंत या भागास पाणी देता येणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हडपसर, काळेपडळ, हंडेवाडी, ससाणेनगर परिसरात पुरेसे पाणी येत नाही. दिवसाआड पाणी येते. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी मुख्यसभेत केली. त्यानंतर नगरसेवक आबा तुपे, प्राची आल्हाट, योगेश ससाणे, संजय घुले, गफूर पठाण, सुभाष जगताप, वसंत मोरे यांनी पाण्याबाबत प्रशासनास धारेवर धरले.

ज्यादा पाणी देणे शक्य नाही
मुख्यसभेत हडपसरला तातडीने जादा पाणी द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावेळी लष्कर जलकेंद्राची क्षमता 350 एमएलडी असली तरी या केंद्रात 450 एमएलडी प्रक्रिया केली जाते. हे पाणी हडपसर व इतर भागातही दिले जाते. त्यामुळे या भागासाठी आणखी काही वेळ पाणी वाढवून देणेच शक्य असल्याचे पाणीपुरवठा विभाग व्ही. जी कुलकर्णी यांनी सांगितले.

पदोन्नतीचा प्रस्ताव अडविला
हडपसरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या तत्कालीन विद्युत अधीक्षक श्रीनीवास कंदूल यांनी चुकीच्या पध्दतीचे नियोजन केल्याने हडपसरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप करत हडपसर भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी कंदूल यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव मुख्यसभेत अडविला.

नगरसेवक झाले आक्रमक
नगरसेवक आक्रमक झाल्याने सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव एका महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेत या वादावर पडदा टाकला. महापालिकेत विद्युत अधीक्षक असलेल्या कंदूल यांची नवीन सेवा नियमावलीनुसार, मुख्य अभियंता या पदावर बढती झालेली आहे. विधी समितीने या बढतीच्या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव शुक्रवारी मुख्यसभेत चर्चेसाठी आला होता. यावेळी हडपसर भागातील नगरसेवकांनी कंदूल यांच्या चुकीच्या कामांमुळेच हडपसरमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यांना बढती देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी या भागातील सर्वच नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी हा बढतीचा प्रस्ताव एक महिना पुढे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.