हडपसर मतदारसंघात चुरशीच्या लढतीची चिन्हे

0

पुणे – बदलत्या राजकीय परिस्थितीत पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढाई होईल अशी चिन्हे दिसत आहेत. पुणे महापालिका हद्दीतील आठही विधानसभा मतदारसंघात २०१४च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला. आगामी निवडणुकांत त्याची पुनरावृत्ती व्हावी याकरिता भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे. मात्र, राजकीय परिस्थिती इतकी बदलली आहे की त्यातून हडपसर मतदारसंघ हा लक्षवेधी ठरू लागला आहे. अलिकडेच भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम या पक्षाशी युती केली आहे.

हडपसर मतदारसंघातील कोंढवा, कात्रज भागात मुस्लिम वस्ती अधिक असून शैक्षणिक संस्थांचे जाळेही आहे. एमआयएमचे नेते ओवैसी यांची गाजलेली सभा कोंढव्यातच झाली होती. येथे एमआयएमचा उमेदवार उभा राहाणार हे निश्चित मानले जाते. आंबेडकरांची साथ असल्याने एमआयएमची ताकद वाढली आहे. काँग्रेस पक्षाला अनुकूल स्थिती होऊ लागल्याने या पक्षातही इच्छुक वाढू लागले असून विशेषतः मुस्लिमांसाठी पक्षाने हा मतदारसंघ सोडावा अशी मागणी काँग्रेसमध्ये होवू लागली आहे. कॉंग्रेसमध्ये मुस्लीमांचा दबाव वाढत आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ दावेदार याच मतदारसंघात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच वरचढ राहाण्याची शक्यता आहे पण मुस्लिम मतांचे काय? हा प्रश्न राष्ट्रवादीपुढे एमआयएममुळे राहील.

भाजपचे योगेश टिळेकर हे तेथील विद्यमान आमदार आहेत. अलिकडे काही प्रकरणात ते टार्गेट झाल्याने चर्चेत आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी या मतदारसंघात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यास शिवसेनेचे शहरप्रमुख माजी आमदार महादेव बाबर यांच्यासाठी सेना हडपसरवर जोरदार दावा करण्याची शक्यता आहे. युती होवो वा न होवो शिवसेना लढणारच असे दिसते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे हेही इच्छुक आहेत.

राजकीय स्थिती अशी गुंतागुंतीची आहे, मुस्लीम मते कोणाकडे? हा प्रश्न आहे. अन्य जातीपातीची गणिते आहेतच त्यामुळे हडपसर मतदारसंघ महाराष्ट्रातील लक्षवेधी आणि अधिक अभ्यासाचा ठरणारा आहे. वाढते नागरीकरण झालेला हा मतदारसंघ आहे. त्यातून उदभवलेल्या पाणी, वाहतूक या समस्या येथे उग्र स्वरूपात आहेत. मतदारसंघातील येवलेवाडीला महापालिकेत समाविष्ट केले असून तिथे स्वतंत्र विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हडपसर महापालिका अस्तित्वात यावी अशी मागणी अधूनमधून होत असते. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका स्थापनेसाठी सर्व्हे करण्यात यावा अशा सूचना दिल्या होत्या.