हडपसर येथील कचरा प्रकल्पाला आणखी तीन एकर जागा देण्यास बहुमताने मंजुरी

0

पुणे । हडपसर येथे 700 टन क्षमतेचा आणखी एक कचरा प्रकल्प करण्यासाठी अतिरिक्त जागा आणि अतिरिक्त प्रक्रिया शुल्क देण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या महापालिका मुख्यसभेत भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. मूळ कचरा प्रकल्पालाच राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध करत मुख्यसभेत प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. मात्र काँग्रेसने राजकीय खेळी करत या प्रस्तावात भाजपला साथ देत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेने मात्र तटस्थतेची भूमिका घेतली.

हडपसर येथील कचरा प्रकल्पाला पूर्वी मंजुरी देण्यात आली होती. मात्र ती जागा अपुरी पडत असल्याने हडपसर मधील रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील 10 एकर जागेवर कचरा प्रकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्याला मंजुरी देण्यात आली. मात्र घनकचरा हाताळणी नियमावली 2016 नुसार प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून मिळणार्‍या परवानग्या, त्यासाठी मंडळाने सुचवलेले मुलभूत बदल, प्रकल्पाचा नवा आराखडा, जागेत बदल या सगळ्या गोष्टींची मान्यता घेणे आवश्यक होते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून पाच जुलै 2017 ला परवानगी देण्यात आली. त्यानंतर प्रकल्पाच्या जागेत बदल झाल्याने प्रक्रिया शुल्कात आणि प्रकल्प शुल्कात सुमारे 108 कोटी रुपयांनी वाढ झाली. या सगळ्या बदलांची पूर्तता करण्यासाठी स्थायी समितीमार्फत मुख्यसभेच्या मान्यतेला हा प्रस्ताव मुख्यसभा सुरू होताच दाखल करण्यात आला आणि बहुमताच्या जोरावर मंजुरही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी याला विरोध केला. मात्र मतदानावेळी काँग्रेसने खेळी करत भाजपच्या बाजूने म्हणजेच प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. 80 विरुद्ध 33 मतांनी हा विषय मंजूर करण्यात आला.

हा प्रस्ताव दाखल करून घेण्याआधीच हडपसर येथील नगरसेवक योगेश ससाणे यांनी या प्रकल्पाला विरोध करण्याला सुरूवात केली. हा प्रकल्प होऊ नये यासाठी आजपर्यंत जेवढा विरोध झाला नसेल त्यापेक्षा जास्त विरोध यापुढे होईल. केवळ पदाधिकारीच नाही तर अधिकार्‍यांनाही घराबाहेर पडू दिले जाणार नाही, असा सज्जड दमच ससाणे यांनी मुख्यसभेत दिला. हा विषय मंजूर करून आम्हाला विरोधाची टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. आमच्यावर हा प्रकल्प लादू नका, असेही ससाणे म्हणाले. मनसेच्या साईनाथ बाबर, वैशाली बनकर, नंदा लोणकर, सुभाष जगताप यांनीही प्रकल्पाला विरोध केला.

…अन्यथा रस्त्यावर उतरू
बहुमताच्या जोरावर हा विषय करू नका अन्यथा आम्ही न्यायालयात आणि रस्त्यावर अशा दोन्ही ठिकाणी लढू. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिला. शहरातील कचरा हडपसरमध्येच जिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे पूर्व भागात अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे येथील नागरिक आता तुमचा कचरा सुद्धा नको आणि तुमची महापालिकाही नको अशा भूमिकेमध्ये आले आहेत. बहुमताच्या जोरावर कचरा प्रकल्प मंजूर कराल मात्र याठिकाणी पाऊल ठेवू देणार नाही. पुण्याच्या चारही बाजूला कचरा प्रकल्प झाले पाहिजेत. अन्यथा काम सुरू करू दिले जाणार नसल्याचा इशाराही तुपे यांनी दिला.