आपल्या नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावल्याने गदारोळ उडाला आहे. पाकिस्तानच्या हडेलहप्पीवर अवघा भारत देश नाराज आहे आणि ते स्वाभाविकही आहे. पाकिस्तानकडून यापेक्षा दुसर्या वर्तनाची अपेक्षाच आपण करू शकत नाही. पाकिस्तानचा हा हडेलहप्पीपणा आपल्याला काही नवा नाही. पण आपल्याकडेही अशी हडेलहप्पी चालते, त्याची दखल आपण घेणार की नाही, हा प्रश्न आहे.
तामीळनाडूतील अण्णाद्रमुकच्या नेत्या दिवंगत जयललिता, द्रमुकचे नेते एम. करुणानिधी, एमडीएमकेचे नेते वायको, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी ही हडेलहप्पी नेत्यांची एक प्रभावळ आपल्याकडे आहे आणि त्यांच्या हडेलहप्पीचे काही बरे-वाईट परिणाम देश म्हणून आपल्याला भोगावे लागत आहेत.
श्रीलंकेतील तामिळींचा प्रश्न गेल्या काही काळापासून संपल्यासारखा वाटतो आहे. परंतु, परिस्थिती तशी नाही. तेथील सरकारने तामिळींना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर पुन्हा तेथे तामिळींची आंदोलने सुरू होणार आहेत. असो. पण एलटीटीईच्या हिंसक कारवायांना तामीळनाडूतील नेत्यांचीच साथ असल्याची बाब कधीच लपून राहिलेली नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली खरी. परंतु, तामीळनाडूतील नेत्यांच्या हडेलहप्पी भूमिकेमुळेच हे मारेकरी आजही जिवंत आहेत, हे वास्तव आहे. याच तामिळी नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळेच श्रीलंकेत चीनच्या शिरकावाला मदत मिळाली होती. श्रीलंकेचे विद्यमान अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी चीनला अटकाव करण्याचे धोरण आखले असले, तरी चीन तेथे आला आहे, हेही वास्तव आहे.
बांगलादेशचे जनक ठरलेले शेख मुजिबूर रहमान यांना भारताबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत. भारताच्या विकासाचे लाभ बांगलादेशलाही मिळावेत, असे वाटत होते. शेख मुजिबूर रहमान यांचे हे स्वप्न आता काही प्रमाणात तरी सत्यात उतरते आहे आणि त्याची जळजळ पाकिस्तानला होते आहे. बांगलादेशबरोबरचे संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न केले आहेत. उभयदेशांदरम्यानचा सीमावाद आणि तिस्ता नदीच्या पाण्याचे वाटप हे उभयदेशांच्या संबंधांत अडसर ठरत होते. यापैकी सीमा वादाचा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यात आला आहे. काही भूभागांची अदलाबदल केल्याने आता दोन्ही देशांदरम्यानचा हा वाद कायमचा निकाली निघाला आहे. परंतु, तिस्ता पाणीवाटपाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. याच प्रश्नात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हडेलहप्पी भूमिका प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
उत्तर, पूर्व भारतातील सुमारे 57 पैकी 54 नद्या बांगलादेशात वाहत जातात आणि पुढे त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्यांपैकी गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि तिस्ता या प्रमुख व मोठ्या नद्या आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा व मेघनेचे पाणीवाटप करार पूर्वीच झाले असून, त्यांचे पालनही योग्य पद्धतीने होत आहे. प्रश्न तिस्तेच्याच पाण्याचा आहे. तिस्तेच्या उपलब्ध पाण्यापैकी 39 टक्के पाणी भारताला, तर 36 टक्के पाणी बांगलादेशला देण्याबाबतचा करार पूर्वीच झाला आहे. उर्वरित 25 टक्के पाण्याचे वाटप नंतर केले जावे, असे त्यावेळी ठरवण्यात आले होते. बांगलादेशातील पाच जिल्ह्यांतील सुमारे दहा लाख लोक आणि सुमारे एक लाख हेक्टरवरील शेती तिस्तेच्या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच तिस्तेच्या उर्वरित पाण्याचे वाटप करण्याचा लकडा बांगला देशने लावला आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात 2011 मध्ये यावर एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार भारताला तिस्तेचे 42.5 टक्के, तर बांगलादेशाला 37.5 टक्के पाणी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. पुढील 15 वर्षांसाठी ही अंतरिम व्यवस्था असेल, असेही निश्चित करण्यात आले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी 2011 मध्ये बांगलादेशचा दौरा केला होता. त्यात ममतादीदीही सहभागी होणार होत्या. मात्र, बांगलादेशाला तिस्तेचे अधिकचे पाणी देण्यास विरोध दर्शवत शेवटच्या क्षणी त्यांनी बांगलादेश दौर्यातून अंग काढून घेतले होते. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या पंतप्रधानाचा धडधडीत अवमान करण्याचे औद्धत्य ममतादीदींनी त्यावेळी केले होते. त्यांची ही कृती हडेलहप्पीच नव्हती काय?
बांगलादेशभोवतीही चीनने असेच जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे. ममतादीदींच्या हडेलहप्पीने चीनलाच बळ मिळण्याचा धोका आहे. 2011 नंतरच चीनने बांगलादेशातील गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केली आहे, हा योगायोग नाही. पश्चिम बंगालच्या वाट्याचे पाणी आम्ही बाहेर जाऊ देणार नाही, ही ममतादीदींची भूमिका आजही कायम आहे. एरवी एखाद्या सभेत बोलण्यासाठी असल्या गर्जना ठीक असतात. परंतु, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक गरजा लक्षात घेऊन जी व्यूहरचना देश म्हणून करावी लागते, त्यावेळी अशा भूमिकांना तिलांजली द्यावी लागते. ममतादीदींसारख्या नेत्याला याची जाणीव नाही, असे नाही. परंतु, तरीही त्यांची हडेलहप्पी संपलेली नाही. ममतादीदी गेल्या वर्षी बांगलादेशच्या दौर्यावर गेल्या होत्या. तेथे त्यांनी, तिस्तेचे अधिकचे पाणी बांगलादेशला देण्याची अप्रत्यक्ष तयारी दर्शवली होती. कधी विरोध, तर कधी सामंजस्य, असा उंदरा-मांजरासारखा त्यांच्या हडेलहप्पी भूमिकेचा खेळ आजही चालूच आहे. ममतादीदींसारख्यांची हडेलहप्पी कायमच राहिली, तर बांगलादेशचाही संयम संपू शकतो. तशी स्थिती उद्भवणेही भारतासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणूनच या हडेलहप्पीचीही आपण गंभीर दखल घ्यायला हवी.
गोपाळ जोशी – 9922421535