हतनूर धरणाचे आठ दरवाजे बंद ; दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

0

भुसावळ- तापी आणि पुर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हतनुर धरणाचे दहा पैकी आठ दरवाजे शुक्रवारी बंद करण्यात आले. यामुळे तापी नदीपात्रात केवळ दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हतनूर धरणाचे गुरूवार पूर्वी चार दरवाजे पाण्याचा विसर्ग होण्यासाठी सुरू करण्यात आले होतेतर तापी आणि पुर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी बर्‍यापैकी पाऊस पडल्याने हतनूर धरण प्रशासनाने सहा दरवाजे गुरूवारी पुर्णपणे उघडले होते. यामुळे हतनुर धरणाच्या दहा दरवाज्यातून तापी नदी व यावलकडे जाणार्‍या कालव्यात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता मात्र शुक्रवारी नद्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने हतनूर धरणाचे आठ दरवाजे बंद करण्यात आले असून केवळ दोन दरवाज्यातून तापीनदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

भुसावळात पावसाची हजेरी
शहरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सहा वाजेपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारासदेखील पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर डबके साचले असून सर्वाधिक त्रास बसस्थानकातील प्रवाशांना जाणवत आहे. शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याची दुरवस्था झाली असतानाच पावसामुळे रस्ता अधिकच खराब बनला आहे.