जलपातळी खालावली ; 2009 नंतर निचांकी पातळी
भुसावळ– हतनूर धरणात 2009 नंतर प्रथमच निच्चांकी जलसाठा झाला असून आजमितीस केवळ 59 टक्के साठा असल्याने आगामी काळात उन्हाळ्यात हतनूरवर अवलंबून असलेल्या गावांसह शहरांना निश्चितच टंचाईच्या झळा बसतील, असा अंदाज आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदाच्या मान्सूनमध्ये अल्प पाऊस झाला. पाणलोटक्षेत्रात दरवर्षी 735 मिलीमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र केवळ 513 मिली पाऊस झाला. यामुळे उशिरापर्यंत आवक न झाल्याने जलपातळी व जलसाठ्यात घट झाली. उन्हाळ्यापूर्वीच हतनूर धरणात 59.61 टक्के जलसाठा शिल्लक आहे. सन 2009 मध्येही याच प्रकारे परिस्थिती असल्याने धरणात फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात सुमारे 60 टक्के जलसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षी 17 फेब्रुवारीला हतनूरमध्ये 66.43 टक्के जलसाठा असतानाही विभागात पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. शहराला उशिराने आवर्तन मिळत असल्याने शहरावर पाणीटंचाईची कुर्हाड कोसळली होती. यंदाही हीच स्थिती कायम राहणार असल्याचे संकेत घसरलेल्या जलसाठ्यावरुन दिसून येत आहेत.
पाच टक्के साठा कमी
हतनूर धरणात गतवर्षी 17 फेब्रुवारी रोजी 212.460 मीटर जलपातळी होती तर 302.40 दलघमी जलसाठा होता. स्थापीत क्षमतेच्या तुलनेत 66.43 टक्के जलसाठा होता तर यंदा 212.230 मीटर जलपातळी आणि 291.00 दलघमी जलसाठा कायम आहे. धरणात केवळ 61 टक्के जलसाठा असून आगामी उन्हाळ्यात तो पुरविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.