हत्तींसाठी पालिका बांधणार स्विमिंग पूल

0

पुणे । कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील दोन हत्तीनींच्या अंघोळीसाठी आता महापालिकेकडून प्राणी संग्रहालय आवारात स्विमिंग टँक उभारला जाणार आहे. त्यासाठी सुमारे 30 लाखांच्या खर्चास स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कात्रज उद्यानात दोन मादी हत्ती आहेत. सध्या खंदक असले तरी नैसर्गिक अधिवासाप्रामाणे अंघोळीसाठी कोणतीही सुविधा नाही. या दोन्ही हत्तींनींना साखळदंडाने बांधूनच अंघोळ घातली जाते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा संग्रहालयात हा स्विमिंग पुलाच्या आकाराचा छोटेखानी तलाव बांधला जाणार आहे.

या दोन हत्तीनींची नावे ‘जानकी’ आणि ‘निरा’ असून त्या 18 आणि 20 वर्षे वयाच्या आहेत. या हत्तीसाठी या उद्यानात खंदक आहे. त्यातच त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. मात्र, त्यांना पाण्यात डुंबण्यासाठी जागा नाही. दररोज त्यांना साखळदंडाने बांधून बंदिस्त जागेत अंघोळ घातली जाते.

उन्हाळ्यात आरोग्यासाठी उपयोग
उन्हाळ्यात हत्तींच्या आरोग्यासाठी त्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्या अंगावर वारंवार पाण्याचा फवारा केला जातो. या सुविधेचा त्यांच्या आरोग्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे हा तलाव उन्हाळ्यात या दोन्ही हत्तींनीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.