जळगाव : रावेर पोलिस स्टेशन अभिलेखा वरील जिल्ह्यातून हद्दपार असलेले तिन्ही आरोपी कोर्ट रोड परिसरात दरोड्याच्या प्रयत्नात फिरत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चॉपर, दोरखंड, मिरचीपुड मिळून आली आहे. त्यांच्याविरुध्द रावेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यात हद्दपार असलेले शेख नादर शेख कादर, शेख मुस्तफा शेख बिस्मीला, आकाश रामदास भालेराव तिघे रा. रावेर हे कोर्ट रोड परिसरात दरोड्याच्या उद्देशान फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांना मिळाली.
पोनि कुराडे यांच्या पथकातील पोहेकॉ रविंद्र गायकवाड, रमेश चौधरी, योगेश पाटील, गफुर तडवी, इद्रीस पठाण यांनी पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्याशी समन्वय साधत पो.नॉ. रविंद्र पाटील, सुरेश मेंढे, जाकीर पिंजारी यांच्या मदतीने भारती ज्वेलर्सचे मालक यांच्या बंगल्यामागे नादर शेख कादर, शेख मुस्तफा शेख बिस्मीला, आकाश रामदास भालेराव यांच्यासह दोघे संशयितरित्या फिरतांना दिसून आले. त्यानंतर तिघांना पोलिसांनी पकडले तर दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले.तिघांवर सन 2011 पासून 8 ते 10 चोरी, घरफोडीचे गुन्हे आहे.
चोरी,घरफोडी,दरोड्याच्या गुन्ह्यात तिघे अट्टल आरोपी
या तिघांना पकडल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून चॉपर, दोरखंड व मिरचीपुड मिळून आली.या तिघांना वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले होते. यातील राजू व मुन्ना हे दोघे फरार झाले. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून दरोड्याच्या उद्देशाने फिरतांना मिळून आलेल्या तिघांविरुध्द भादवी कलम 399, 402 तसेच मुंबई पोलिस कायदा कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख नादर शेख कादर वय 36, हा टोळीतील मुख्य सुत्रधार असून आकाश भालेराव वय 20, शेख मुस्तफा शेख वय 21 या दोघांचा या टोळीत सहभाग आहे. यातील राजु व मुन्ना हे दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले.