भुसावळ । शहराचे आराध्य दैवत असलेले राममंदिर वॉर्डातील बडा हनुान मंदिरात मंगळवार 11 रोजी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करुन जयंती साजरी करण्यात येणार आहे. हनुमान जयंती निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवार 10 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते हनुमान जन्मापर्यंत म्हणजे 11 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत अखंड हनुमान चालिसाचे पठण गोविदं अग्रवाल, सुरेश शर्मा, रविंद्र पुरोहित, श्रीकांत नागला, चिंटू झवंर, योगेश अग्रवाल यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. या अखंड हनुमान चालिसापठणाला संपुर्ण दिवस भरात भाविकांनी सहभागी होवून पठण करावे असे आवाहन बजरंग भजनी मंडळाचे अध्यक्ष रविंद्र पुरोहित यांनी केले आहे.
सायंकाळी काढणार शोभायात्रा
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील भारतात अतिशय दुर्मीळ होणारी हनुमंताची सहस्त्रनाम पुजन व सहस्त्रधारा महाअभिषेक होय. या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे या पुजेत 9 जण बसतात. हनुमंताच्या 1 हजार नावाने विविध वस्तूंची यथाशक्ती आहुती दिली जाते व 1 हजार धारांनी हनुमंताचा महाभिषेक होतो. पहाटे 3.30 वाजेपासून हनुमंताला पंचामृताने अभिषेक होणार आहे. सकाळी सुर्योदयाच्या वेळेस हनुमंताच्या जन्मसोहळा महाआरती होईल. नंतर दिवसभर पंजेरीया विशिष्ठ प्रसादाचे वाटप होणार आहे. सकाळी 10 वाजता अखंड हनुमान चालीस पठणाचे पुर्णाहुती होम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता हनुमान जयंतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील तसेच परिसरातील हनुमान भक्तांनी हजारोच्या संख्येने या मिरवणूकीत सहभागी व्हावे असे आवाहन मंदिराचे महंत प्रशांत वैष्णव यांनी केले आहे. रात्री 9 वाजता भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.
फुलगाव शिवारातील हिरा मारोती येथे महाप्रसादाचा कार्यक्रम
तालुक्यातील फुलगाव शिवारातील व राष्ट्रीय महामार्गालगत असलेले प्राचीन जागृत देवस्थान हिरा मारोती मंदिर येथे 11 रोजी हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीनिमित्त जागृत देवस्थान हिरा मारोती मंदिर येथे सकाळी 6 वाजता जन्मोत्सव, अभिषेक, पुजा, आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. तर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन हिरा मारोती मंदिराचे पुजारी महंत गोरखनाथ बाबा यांनी केले आहे.