पिंपरी-चिंचवड। चिंचवड येथील एका मॉल समोरील दोन हातगाड्यांची तोडफोड करून हप्ता मागणार्यांना पुणे युनिट चारच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अमर चव्हाण, अनिकेत कांबळे, रोहित ऊर्फ करण भोरले, गौरव ऊर्फ नन्या गौतम वाघमारे, आदेश ऊर्फ भैया गायकवाड आणि महेश ऊर्फ मैश्या कांबळे यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जीवे मारण्याचीही धमकी
याप्रकरणी सुरेश आनंद पवार (रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, चिंचवड स्टेशन येथील एका मॉलसमोरील मसाला डोसा विक्रेत्याकडे हप्ता देण्याची मागणी करीत दोन हातगाड्यांची तोडफोड केली. हातगाड्यांच्या गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली. तसेच या विरोधात पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काल (सोमवारी) रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकजण सराईत गुन्हेगार
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करताना, पोलीस नाईक संतोष बर्गे यांनी चिंचवड स्टेशन येथील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, हा गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली. या मुलांनी दिलेल्या माहितीवरून आरोपींना अटक केली असून, यापैकी अमर चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे.
यांनी केली कारवाई
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने ही कारवाई केली.