धुळे । माथाडी मंडळ बंद करुन त्याऐवजी माथाडी महामंडळ निर्माणकरण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहिर केला आहे. या निर्णयालाविरोध करीत आज धुळे बाजार समितीतील सर्व हमाल मापाडी कामगारांनी कामबंद ठेवीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. हमाल मापाड्यांच्या या बंदमुळे आज मंगळवारी बाजाराच्या दिवशीच बाजार समितीचे कामकाज ठप्प राहिले.
धुळे हमाल मापाडी कामगार संघटनेने राज्य सरकारच्या माथाडी मंडळे बंद करण्याच्या निर्णयास विरोध केला आहे. राज्यात 1974 पासून हमाल मापाडी कष्टकरी कामगारांचे कल्याण व्हावे या हेतूने माथाडी कामगार कायदा निर्माण करुन माथाडी मंडळे स्थापन करण्यात आली. राज्यात 36 माथाडी मंडळे कार्यरत आहेत. यातील काहींचा कारभार असून नसल्यासारखा दिसतो. कारण तिथे अपूर्ण सेवक वर्ग असतांनाही सातत्याने त्यांना कामगार संघटनांतर्फे कामकाजासाठी मदत दिली जाते. या मंडळातर्फे माथाडी कामगारांना प्राव्हीडंड फंड, बोनस, ग्रॅज्युईटी, विमा आदींची सोय दिली जाते. अस असतांना ही मंडळे बंद करुन त्याचे रुपांतर महामंडळात करण्याचा निर्णय माथाडींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारा ठरु शकतो. तो निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली.