वितरण व्यवस्था भुसावळ तालुक्यात रॉकेलचे सहा हजार 44 ग्राहक
भुसावळ- गॅस जोडणीची अचूक माहिती शासनाला मिळावी, यासाठी 1 सप्टेंबर 2018 च्या शासन परिपत्रकानुसार गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांनी 30 सप्टेंबरपर्यंत संबंधित एजन्सीकडे हमीपत्र सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाने दिल्या आहेत. हमीपत्र सादर न केल्यास गॅस कनेक्शन नसलेल्या ग्राहकांचा रॉकेलपुरवठा ऑक्टोबरपासून बंद केला जाणार आहे. भुसावळ तालुक्यात शिधापत्रकाधारकांची संख्या 91 हजार 850 तर गॅस ग्राहकांची संख्या 85 हजार 806 इतकी आहे. त्यामुळे 6 हजार 44 ग्राहकांकडे गॅस नसल्याचे समोर आले आहे. गॅस नसलेले 6 हजार 44 ग्राहक रॉकेलचा वापर करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. बहुतांश शिधापत्रिकाधारकांनी अद्यापही आधार नोंदणी केलेली नाही. तर अनेक ग्राहकांकडे गॅस कनेक्शन असूनदेखील त्यांनी अद्याप खरी माहिती पुरवठा विभाग अथवा संबंधित गॅस एजन्सीला कळवलेली नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना गॅस नोंदणीचे हमीपत्र सादर करण्याची सूचना दिली आहे. गॅस ग्राहकांना शासनाकडून सवलतीच्या दरात वर्षभरात 12 सिलिंडर पुरवले जातात. सवलतीच्या दरात सिलिंडरचा वापर करणार्या ग्राहकांना रॉकेचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे पडताळणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.