अमळनेर । तालुक्यातील सडावन येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व संतप्त शेतकर्यांनी शनिवार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता अमळनेर पारोळा येथे रास्ता रोको केला. कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव द्यावा, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तालुका लवकर दुष्काळी जाहीर करावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी पाटील, सडावणचे माजी सरपंच अशोक पाटील, मधुकर पाटील आदींच्या नेतृत्वात सुमारे 200 ते 300 शेतकर्यांनी सडावण येथे रास्ता रोको केला. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा, कापसाला हमीभाव द्यावा अशा विविध मागण्याचा घोषणा देऊन शासनाविषयी संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या यावेळी मोर्चेकरी शेतकर्यांनी कापसाचे पीक घेऊन रस्त्यावर ठाण मांडले.
खासदार ए.टी.नाना पाटील यांनी घेतली भेट
शिवाजी पाटील, अशोक पाटील यांनी खासदार पाटील यांना शेतकर्यांच्या विविध समस्यांची माहिती दिली. खासदार पाटील यांनी शेतकर्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शेतकर्यांनी कायदा हातात घेऊन नये. लवकरच सर्व समस्या सुटतील असे आश्वासन दिल्याने शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी खासदार पाटील व तहसीलदार प्रदीप पाटील यांना शेतकर्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, सतीश पाटील, ज्ञानेश्वर मिस्तरी, गणेश पाटील, धनराज पाटील आदींसह सुमारे पाचशे शेतकर्यांनी सहभाग घेतला. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. पोलिस उपअधीक्षक शेख, पोलिस निरीक्षक विकास वाघ आदींच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दंगा नियंत्रक पथक व राज्य राखीव दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले होते.
वाहतूकीचा झाला खोळंबा
अमळनेर- पारोळा हा रस्ता नेहमी वर्दळीचा असून मोक्याच्या ठिकाणी सडावण येथे रास्तारोको करण्यात आल्याने वाहनांच्या दोन्ही बाजूला मोठ्या रांगा जमा झाल्या त्यात बस, खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांचा जमा होऊन खोळंबा झाला. सुमारे शंभर ते दीडशे वाहने याठिकाणी अडकून पडली. त्या वाहनात असणार्या प्रवाशांना सुमारे तीन तास ताटकळत राहावे लागले. एका रुग्णास घेऊन जाणार्या खासगी वाहनासही संतप्त शेतकर्यांनी अडविले. या वाहनात रुग्ण असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या वाहनास तत्काळ मार्ग मोकळा करून दिला.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
या अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा. शेतकर्यांना पीक विमा त्वरित मंजूर करावा. कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमीभाव द्यावा. सडावण गावासाठी पपाटचारीचे काम त्वरित सुरू करावे. चिखली नदीवरील धरणाच्या कामास त्वरित मंजूरी द्यावी. शेतकर्यांचे वीजबिल माफ करावे. 2009 ते 2017 सरसकट कर्जमाफी द्यावी. गिरणा कॅनॉलचे पाणी भोकरबारी धरणात सोडावे. खासदार ए. टी. पाटील यांनी आंदोलन ठिकाणी भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. लवकरच समस्या सुटतील असे आश्वासन दिल्यानंतर अकराच्या सुमारास शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतले.