भुसावळ । रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळात हरविलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी येणार्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यासह देशभरातून हरविलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी कुटुंबियांची मात्र शहरात दमछाक होते. या कुटुंबियांना मदत करुन हरविलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी आता शहरात मिसिंग सेंटरची स्थापन करण्यात येणार आहे. कंडारीत या मिसिंग सेेंटरचे मुख्यालय असे तर शहरातील सर्व क्षेत्रात काम करणार्या 500 लोकांचा चमु या कार्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभाग राहणार आहे.
रेल्वे प्रवासात वयोवृध्द, मनोरुग्ण, कौटुंबिक वादातून घर सोडून आलेले व्यक्ति, लहान मुले यांचा शोध घेण्यासाठी देशाच्या विविध भागातून लोक शहरात येतात. मात्र शोध घेतांना त्यांची दमछाक होते. पोलीस प्रशासनातर्फे देखील योग्य सहकार्य मिळत नाही. त्यामुळेे मिसिंग सेंटरची स्थापना कोळी समाजाच्या जिल्हाध्यक्षा रुपाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून हरविलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्याची यंत्रणा राबविली जाईल. या सेंटरमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तिंचा सहभाग घेतला जाणार आहे.