ठाणे । वाढत्या शहरीकरणामुळे शहरांमधील हिरवाई लोप पावत असल्याने पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम पाहता, हे हरित क्षेत्र पुन्हा वाढवण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्र सरकारच्या अमृत योजनेनुसार केडीएमसीच्या 2 कोटी रुपयांची हरित क्षेत्र वाढवण्याच्या प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली. या निधीतून रोपण झालेल्या झाडांपैकी किमान 80 टक्के झाडे जगतील, याची दक्षता घेण्याचे बंधन सरकारने महापालिकेला घालून दिले आहे. ही सर्व कामे जूनअखेर पूर्ण करण्याचे आदेश सरकारने योजना मंजूर करतानाच दिले आहे.
तांत्रिक समितीची मान्यता
पालिकेच्या उद्यान विभागाने मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणार्या वड, पिंपळासारख्या झाडांची लागवड रस्त्याच्या कडेला न करण्याचे धोरण स्वीकारल्याने केवळ शोभेच्या झाडांचा समावेश अधिक प्रमाणात दिसतो. केंद्र सरकारच्या अमृत योजनेनुसार केडीएमसीच्या 2 कोटी रुपयांची हरित क्षेत्र वाढवण्याच्या प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली. या निधीतून रोपण झालेल्या झाडांपैकी किमान 80 टक्के झाडे जगतील, दक्षता घेण्याचे बंधन सरकारने पालिकेला घालून दिले आहे.
शहराचा श्वास कोंडतोय
कल्याण-डोंबिवलीत सुमारे 30 किलोमीटर रस्ते गेल्या 8 वर्षांत काँक्रीटचे करण्यात आले. त्यावेळी रस्त्यांच्या कडेला असलेल्या शेकडो वृक्षांचा बळी घेण्यात आला. तसेच पावसाळ्यात उन्मळून कोसळलेल्या झाडांची गणतीच नाही. याशिवाय बेकायदा ज्या झाडांची कत्तल होते व कोणत्या तरी रोगाची लागण होऊन जीव गमावलेल्या अशा झाडांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पालिकेकडून रोपण होत असलेल्या झाडांची संख्या मात्र अगदी नगण्य आहे. त्यामुळे या शहरांचा श्वास कोंडू लागला आहे. झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी अहे.