किन्हवली । शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अल्याणी शैक्षणिक केंद्रातील शेलवली (बांगर) येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 18 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील सातत्यपूर्ण यश, समूह गायन व क्रीडास्पर्धा यात उल्लेेखनीय कार्य त्यांनी केले असून त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
विद्यार्थी लिखित ठाणे जिल्ह्यातील पहिला किलबिलाट हा काव्य संग्रहही प्रकाशित केला असून शिष्यवृत्ती परिक्षेवर आधारित ज्ञानकुंभ व इतर पुस्तकांचे लेखनही केले आहे. याच बरोबर जीवन शिक्षण, वर्तमानपत्र व इतर अनेक मासिकांत त्यांनी शैक्षणिक लेखन केले आहे. जाणीव प्रतिष्ठान व विंग्स फॉर ड्रीम्स फाउंडेशनमार्फत विद्यार्थी तसेच शाळा दत्तक योजना, रक्तदान तसेच महिलांसाठी स्वंय सिद्धा योजना अशा अनेक सामाजिक उपक्रमाबरोबरच नॉलेज अॅकेडमी, शहापूर यात शालेय स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिरे आयोजन करण्यातही त्यांचा सिहांचा वाटा आहे.