पुणे – हल्लाबोल सभेतील टीका मुख्यमंत्र्यांना चांगलीच झोंबली आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली जाते, मात्र त्याला ते कधी उत्तर देत नाहीत आणि मी ही देणार नाही. शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी सकाळी पालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवारांचे महत्व समजले
सत्तेत येऊन ४ वर्ष झाली तरीही अजून पवारच लागतात यावरून त्यांचे महत्त्व समजते, असे सुप्रिया म्हणाल्या, महापालिकेच्या मुद्द्यावर बोलताना पुणे महापालिकेत समाविष्ट ११ गावांमध्ये रस्ते, पाणी, आरोग्य अशा मुलभूत समस्यांवर काम होण्याची गरज आहे. ८ महिन्यांनतरही पालिका काही करत नाही, असेच चित्र आहे. आयुक्तांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती सुळे यांनी यावेळी दिली. गदिमा यांचे स्मारक ही गोष्ट महापालिकेला अभिमानाची वाटली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला समाधान वाटेल असे त्यांचे स्मारक इथे व्हायला हवे. त्यावर काही होत नाही, हे खेदजनक आहे, असेही त्या शेवटी म्हणाल्या.