हल्ल्याप्रकरणी एकाला पाच वर्षांची शिक्षा

0

जळगाव। चाळीसगाव येथील यशवंत राघो पाटील हे त्यांची पत्नी आशाबाईसह 29 जुन 2012 रोजी धुळे लग्नसमारंभासाठी गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांच्या घराशेजारील रहिवाशी विजय नवीनचंद सोनी, त्यांची पत्नी राखी सोनी व आई लिलाबाई सोनी यांचा गटर काढण्याच्या कारणावरून यशवंत पाटील यांच्याशी वाद झाला. या किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत होवून विजय सोनी त्यांच्या ताब्यातील टॉमीने फिर्यादी यशवंत पाटील यांची पत्नी आशाबाईच्या डोक्यात मारली होती. सोनी यांनी एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली होती. दरम्यान याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात विजय सोनी, राखी सोनी व लिलाबाई सोनी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

16 साक्षीदारांची तपासणी
आरोपींविरुध्द न्यायालयात दोषाररोपपत्र दाखल झाल्यानंतर गुन्हाचे कामकाज होवून न्यायालयाने फिर्यादी, जखमी आशाबाई पाटील, प्रत्यक्षदर्शी बेबाबाई पाटील, संभाजी पाटील, लक्ष्मीकांत मगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवरे, तपासधिकारी एपीआय व्ही.एस देवरे यांच्यासह न्यायालयाने 9 साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी यांचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या सर्वांचा पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी क्रमांक 1 ला दोषी ठरवून 5 वर्ष सक्तमजुरी शिक्षा, 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. यातील 20 हजार नुकसान भरपाई जखमी आशाबाईंना देण्याचे आदेश न्या. लाडेकर यांनी दिली. सरकारपक्षांतर्फे अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी व रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.