हळवी कांद्याची मोठी आवक, भाव पडले!

0

बाजार समितीत 220 ते 280 रुपयांनी नवीन कांद्याचे दर घसरले; किरकोळ बाजारातही 8 ते 10 रुपयांनी कांदा स्वस्त
पुणे : केंद्र शासनाच्या कांदा आयतीची धोरणामुळे दर पडण्याची भीती व ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता पाहाता, धास्तावलेल्या शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल 200 ते 220 ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर 220 ते 280 रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे 8 ते 10 रुपयांनी उतरले. या घसरणीचा शेतकरीवर्गाला मोठा फटका बसला आहे.

दर पडण्याच्या भीतीने आवक वाढली
परदेशातून आयात करण्यात येत असलेल्या कांद्यामुळे दर पडण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये आहे. यामुळे नवीन हवळी कांद्याची आवक सुरु होण्यासाठी अद्याप पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी बाकी असताना शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी बाजारात आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने संगमनेर व श्रींगोदा परिसरातून आवक झालेल्या कांद्यामध्ये 60 ते 70 टक्के कांदा कच्चा व अपरिपक्व आहे. अचानक आवक वाढल्याने व कांद्याचा दर्जा कमी असल्याने कांद्याच्या दरामध्ये एकाच दिवशी आठ ते दहा रुपयांची घसरण झाली आहे. यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागात परतीच्या पावसाने पिकांचे त्यातही कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे नवीन हवळी कांद्याची आवक कमी झाली होती, तर जुन्या कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. यामुळे पंधरा दिवसांपूर्वीच पुणे बाजार समितीत कांद्याला उच्चांकी म्हणजे 300 ते 400 रुपये दहा किलोला दर मिळाले. कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र आणि पुण्यात इजिप्तचा कांदा आलादेखील. परंतु सर्वसामान्य ग्राहकांकडून त्याला फारसा उठाव मिळाला नाही. यामुळे परदेशातून कांदा आयात करूनदेखील दरामध्ये फार फरक पडला नव्हता.

संगमनेर, श्रीगोंद्यातून आला कच्चा कांदा
भाजप सरकारकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, यामुळे भविष्यात कांद्याचे दर कोसळण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये आहे. तर सध्याचे ढगाळ वातावरणामुळे पाऊस झाल्यास हाताशी आलेले कांद्याचे पीक पुन्हा खराब होईल, या धास्तीमुळे शेतकर्‍यांनी नवीन हळवी कांद्याचा हंगाम सुरु होण्यास 15 ते 20 दिवस शिल्लक असताना कच्चाच कांदा बाजारात विक्रीसाठी आणला आहे. शुक्रवारी मार्केट यार्डमध्ये नवीन हळवी कांद्याचे 200 ते 220 ट्रक आणि जुन्या कांद्याचे 15 ते 20 ट्रक आवक झाली. आवक वाढल्याने दरामध्येदेखील मोठी घट झाली. सर्वसाधारण कांद्याला 270 ते 280 दर देण्यात आले. तर संगमनेर विभागातील कांद्याला 220 ते 280, श्रींगोदा परिसरातील कांद्याला 150 ते 250 रुपये दहा किलो आणि जुन्या कांद्याला 300 ते 360 रुपये दहा किलो दर देण्यात आला.