पुणे । हवामानात सातत्याने होणार्या बदलांमुळे विषाणूजन्य आजारांनी पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. या पाश्वभूमीवर नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि ससून रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.आठवडाभर तापमानात घट झाल्याने पुणेकरांनी गुलाबी थंडीचा सुखद अनुभव घेतला. मात्र त्यानंतर शनिवारपासून शहरात पुन्हा एकदा ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. अरबी समुद्रातील ओखी चक्रीवादळामुळे राज्याच्या इतर भागांसह पुणे शहरात तुरळक पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्दी, पडसे, हिवताप यांसारख्या विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याची माहिती ससून रुग्णालयाचे डॉ. सोमनाथ सलगर यांनी दिली.
डेंग्यू, मलेरियाचा धोका
शहरात थंडीचे आगमन झाल्यानंतर डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया अशा प्रकारच्या कीटकजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र सध्या शहरात पुन्हा ढगाळ हवामान निर्माण झाले असल्याने कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पाऊस पडल्यास आपल्या इमारतीच्या परिसरात, तसेच झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने फरक पडत असल्याने पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्दी, पडसे, हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली. हवामानामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे विषाणूजन्य आजार वेगाने पसरतात. अशा प्रकारे आजारांचा फैलाव होणे गंभीर असल्याने अंग दुखणे, वारंवार ताप येणे, सर्दी-पडसे, गुडघेदुखी, अशक्तपणा यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करण्याविषयी त्यांनी सांगितले. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला आणि लहान बालके यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.