हातगाडी-टपरीधारकांचा पालिकेवर महामोर्चा !

0

विविध भागात कारवाई होत असल्याने तीव्र शब्दात संताप

व्यवसाय बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी

पिंपरी चिंचवड: नॅशनल हॉकर्स फेडरेशन ऑफ़ इंडिया आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनावर शुक्रवारी सकाळी महामोर्चा काढण्यात आला. क्रांतिवीर लहुजी वस्ताद आणि वासुदेव फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात झाली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मारुती भापकर, मनसे गटनेते सचिन चिखले, शेकापचे हरीश मोरे, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यु पवार, अ़ॅड. मोहन अडसुळ, के.के. कांबले, राजू बिराजदार, कविता खराडे, राजेंद्र वाघचौरे, बाबासाहेब चव्हाण आदिसह फेरीवाले मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सर्वांना परवाने द्या 
पिंपरी चिंचवड शहरात हातगाडी, फेरीवाले यांच्यावर विविध भागात कारवाईबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. त्यामुळे हॉकर्स झोन झालेच पाहिजे, नको स्मार्ट सिटी, पाहिजे फक्त रोजी रोटी, हातगाडी आमच्या हक्काची, सर्वांना परवाने द्या, उर्वरित सर्वेक्षण करा, जप्त गाड्याचा दंड कमी करा, आदी मागण्याचे फलक हातात घेऊन विक्रेते सहभागी झाले. स्मार्ट सिटीत हॉकर्स झोनमध्ये सामावून घेण्यासाठी आग्रही असल्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

खोटे गुन्हे दाखल 
यावेळी नखाते म्हणाले की, महापालिका फेरीवाला कायद्याची अमंलबजावनी न करताच, शहर फेरीवाला समितीची बैठक न घेता मनमानी पद्धतीने कारवाई करत आहे, झोनबाबत दुर्लक्ष आणि कारवाईवर लक्ष अशी भूमिका चुकीची आहे. मानव कांबळे म्हणाले, सचोटीने व्यवसाय करणार्‍यावर कारवाई करीत त्यांचेवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. पोलिस मुद्दाम फेरीवाल्यांना झालेली मारहाण व गुन्हा दाखल करण्याची मागणी धुडकावत मनपा अधिकार्‍यांना वाचवित आहे.

आठवड्यात निर्णय घेवू 
यावेळी मनपा कार्यकारी अभियंता सतीश इंगळे आणि राजेंद्र राणे यांनी मोर्चा स्थळी येवून निवेदन स्विकारले. आंदोलनादरम्यान येत्या आठवड्यात आयुक्त आणि सर्व विभागांची बैठक घेवून फेरीवाल्यांशी तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुरेश देड़े, कासिम तांबोळी, मधुकर वाघ, मनोज पाटील, जरिता वाठोरे, पुष्पा पातोळे, लीला कांबळे, किरन सादेकर, अंजना गुंड, समाधान जावळे, राजू बोराडे, बिलाल तांबोळी, सुलोचना मिरपगारे, बालाजी लोखंडे, नादिम पठान, संभाजी वाघमारे आदिंनी परिश्रम घेतले.