हाताला काम देणारे शिक्षण हवे!

0

पिंपरी-चिंचवड : आपल्या इथे पारंपरिक शिक्षण पद्धती आहे, ज्यातून आपण शिक्षण घेत आलोय. ही पद्धत जरी चांगली असली तरी, ती हाताला काम देणारी पद्धत नाही. त्यामुळे इथून पुढे केवळ पदवी देणारे नाही तर हाताला काम देणारे शिक्षण विद्यार्थ्यांना हवे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. किवळे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अ‍ॅन्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या स्किल सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन बुधवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सिम्बॉयसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार, डॉ. स्वाती मुजुमदार, श्रावण कर्वे आदी उपस्थित होते.

कौशल्य विकास केंद्रांची गरज
फडणवीस म्हणाले, सिम्बॉयसिस विद्यापीठाने ही सुरुवात केली आहे. मात्र संपूर्ण देशात अशी कौशल्य विकास केंद्रे तयार होणे गरजेचे आहे. आता कवेळ तुम्ही कागदोपत्री शिक्षण घेऊन नाही चालणार तर त्याला अनुभवाची, चौकटी बाहेरील ज्ञानाची गरज आहे. आपल्या इथे एक पद्धत बनली आहे की पदवी असली तरच तुमच्या कौशल्याला किंमत राहते अन्यथा त्याला कोणी विचारीत नाही. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. शिक्षणाएवढेच कौशल्य देखील महत्वाचे आहे. भारतात 50 टक्के तरुण वर्ग आहे. जो प्रत्येक देशाकडे असतोच असे नाही. या वर्गाला योग्य ती दिशा दिली नाही तर हाच युवकवर्ग देशाला हिताचा ठरण्याऐवजी देशाला घातक ठरू शकतो. यासाठी देशात अशी कौशल्य विकास केंद्रे व त्यांचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत, फडणवीस यांनी व्यक्त केले.