भारताची मुत्सद्देगिरी यशस्वी
नवी दिल्ली : भारताची मुत्सद्देगिरी आणि अमेरिकेच्या दबावानंतर हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जमात-उद-दावा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला गेल्या आठवड्यात लाहोर उच्च न्यायालयाने मुक्त केले होते. एक आठवडा मोकाट फिरल्यानंतर हाफिज सईदला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे.
दहा महिन्यानंतर झाला होता सईद नजरकैदेतून मुक्त
जानेवारी 2016 पासून हाफिज सईद आणि त्याच्या अन्य सहकार्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अटकेला दहा महिने झाल्यानंतर मागील आठवड्यात गुरुवारी त्याला नजरकैदेतून मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर भारताने तीव्र शब्दात निषेध नोंदवत सईदला पुन्हा अटक करण्याची मागणी केली होती. भारताच्या मागणीची अमेरिकेने रि ओढली. मुंबई हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदला अटक करून शिक्षा केली पाहिजे, अशी मागणी अमेरिकेकडूनही करण्यात आली. ‘लश्कर-ए-तोयबा’ या संघटनेने घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक नागरिकांसह विदेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला असून, यात अमेरिकी नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ‘लश्कर-ए-तोयबा’वर कारवाई करण्याची मागणी केली होती. भारत व अमेरिकेकडून दबाव येत असताना पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या ‘लश्कर-ए-तोयबा’चा मी स्वतः खंदा समर्थक आहे आणि हाफीज सईदला भेटलो आहे. त्याची कश्मीरबद्दलची भूमिका मला पसंत आहे, असे मुशर्रफ म्हणाले होते.