मुंबई । पुन्हा एकदा भारताची समुद्र किनारपट्टी धोक्यात आली आहे. काही दहशतवादी मासे पकडण्याच्या जहाजाने दहशतवादी राज्यात शिरल्याच्या गोपनीय माहितीने खळबळ उडाली आहे. त्यानंतर समुद्रकिनार्यावरील सर्व जहाज आणि कॅसिनोंना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीजने हा इशारा किनारपट्टीलगतच्या सर्व राज्यांना दिला आहे. त्यामुळे सर्वत्र सर्च ऑपरेशन्स सुरू झाले आहे.
केरळ, गोवा, महाराष्ट्र, गुजरात निशाण्यावर
भारतीय तटरक्षक दलाने पश्चिम किनार्यालगत दहशतवादी हल्ला होण्याबाबत गुप्त माहिती दिल्यानंतर येथील सर्व जहाज आणि कॅसिनोंना बंदर खात्यामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे बंदर खात्याचे मंत्री जयेश सलगावकर यांनी दिली. हा सतर्कतेचा इशारा केवळ गोवा राज्यासाठी नसून मुंबई आणि गुजरातच्या समुद्रकिनार्यावरदेखील या हल्ल्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून जप्त करण्यात आलेले मासे पकडण्याचे जहाज सोडून देण्यात आले आहे. याच जहाजातून दहशतवादी येण्याची शक्यता असल्याचेही सलगावकर म्हणाले. यामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, केरळ आणि कर्नाटकातही सर्व सुरक्षा यंत्रणा तपास कामाला लागल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे.
कसाब हल्ल्याची आठवण
समुद्र मार्गे येऊन मुंबईवर झालेला अजमल कसाब आणि त्याच्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या 26/11च्या मुंबई हल्ल्याची आठवण आजही मुंबई सुरक्षा यंत्रणेला आहे. मुंबईच्या किनार्यावर असलेल्या कुलाब्याच्या मच्छीमार कॉलनीतून ते आत शिरले होते. तेव्हा वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांसह 164 जणांचा बळी गेला होता, तर 368 जण गंभीर जखमी झाले होते. भारताला जबर धक्का देणारी ही घटना होती. त्याची पुनर्रावृत्ती होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. तटरक्षकदलही या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.