मुंबई : कॉफी विथ करणच्या कार्यक्रमातील वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुलला निलंबित करण्यात आले आहे. दोघांचे पुनरागमन कधी होणार हे अद्याप सांगणे अवघड आहे. मात्र दोघांचे पुनरागमन पुन्हा आणखी लांबणीवर गेले आहे. कारण बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे पांड्या व राहुल यांना मैदानावर परतण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांच्या इंडियन प्रीमिअर लीग आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील समावेशालाही धोका पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या दोघांवर बंदीची कारवाई झाल्यास त्यांना आयपीएलच्या सामन्यांनाही मुकावे लागेल आणि त्याचा फटका त्यांच्या वर्ल्ड कप संघातील समावेशावरही होऊ शकतो. प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी लोकआयुक्ताच्या नियुक्तीची मागणी केली होती. बीसीसीआयकडे लोकआयुक्त नाही आहेत आणि त्यामुळे पांड्या व राहुल यांच्यावरील निर्णयाला विलंब होत आहे.
पांड्या व राहुल यांच्यावर दोन सामन्यांच्या बंदीचा प्रस्ताव राय यांनी ठेवला होता, परंतु प्रशासकीय समितीतील सदस्या डायना एडुल्जी यांनी दोघांवर कठोर शिक्षेची मागणी केली. त्यामुळे दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारी बोलावण्यात आले. शिवाय बीसीसीआयने त्यांच्यावर निलंबनाची कामगिरीही केली. या दोघांना बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती आणि त्यावर त्यांनी माफीही मागितली.