हार्वेस्टरवर मालवाहू चारचाकी धडकल्याने दोघांचा मृत्यू

धाबेपिंप्री शिवारात अपघात : मयत मध्यप्रदेशातील रहिवासी : दोघा जखमींवर मध्यप्रदेशात उपचार

मुक्ताईनगर : हार्वेस्टरने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येत असलेली चारचाकी हार्वेस्टरवर धडकून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. हा अपघात धाबे पिंपरी शिवारात गुरुवारी बुधवारी रात्री 12 वाजेनंतर उशिरा झाला. मयत हे मध्यप्रदेशातील शहापूरचे रहिवासी आहेत.

दोघे जागीच ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील धाबे पिंपरी शिवारात समोर चाललेल्या हार्वेस्टर (एच.आर.05 एई 4699) ने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून मुक्ताईनगर येथून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे मंडप डेकोरेशन काढून परत येत असलेल्या मालवाहू चारचाकी (एम.पी.09 जी.एफ.2293) हार्वेस्टर वाहनावर आदळून अपघात झाला. या अपघातात खुशाल प्रकाश महाजन (भाने, 21) व राजू उर्फ बबलू वसंत महाजन (26, दोन्ही रा.शहापूर, जि.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला तर बाळू वासुदेव सोनवणे व मालवाहू गाडीचा चालक मयूर सोपान राखुंडे हे जखमी झाले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात विनोद शंकर चौधरी (44, धंदा विनोद टेन्ट हाऊस. राहणार बँक ऑफ इंडिया समोर, मेन रोड, शहापूर) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गंभीर जखमींना बर्‍हाणपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तपास पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.