माथेरान । जल हे जीवन आहे. जलयोजना ही आजही अनेक भागांत स्वातंत्र्यानंतरसुद्धा पोहोचलेली नाही. त्यामुळे अनेक आदिवासी वाड्यांचा पुनर्विकास होण्यासाठी तळागाळातील लोकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ही बाब ओळखून आम्ही माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या हाश्याची पट्टी या आदिवासी वाडीत पाण्याची सोय व्हावी यासाठी स्थानिकांच्या आग्रहास्तव अल्काम लॅबोरेटरी लिमिटेड या कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांशी वारंवार संपर्क केल्यावर ही पाणी योजना माथेरान नगरपालिका आणि अल्काम कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित झाली आहे, असे प्रतिपादन माथेरान नगरपालिकेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी केले.
10 रोजी हाश्याची पट्टी येथे पाणी योजनेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. या दुर्गम भागातील महिला भगिनींचा पाण्यासाठी होणारा मनस्ताप यापुढे संपुष्टात आलेला असून सध्या पाण्याची अर्धा इंची पाईप लाईन देण्यात आलेली असली तरीसुद्धा पुढील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एक इंच पाइपलाइन टाकण्याची व्यवस्था लवकरच करण्यासाठी नगरपालिका आणि अल्काम कंपनी अग्रेसर राहील असे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले. एकूण 67 घरे या गावात अस्तित्वात असून सर्वांचे जीवनमान हे माथेरान पर्यटनस्थळावर अवलंबित आहे. स्थानिक रहिवासी नरेश खडके आणि जना घुटे यांनी आम्हाकडे पाण्याबाबतीत सतत पाठपुरावा केला होता.