हरताळा फाट्याजवळ अपघात ; भरधाव डंपरची दुचाकीला धडक
मुक्ताईनगर- महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल गीतांजलीजवळ भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने बोदवड तालुक्यातील हिंगणा गावातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 11 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने हिंगणे गावावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल गीतांजलीजवळ सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपर (एम.एच.19 सी.वाय.3246) ने मुक्ताईनगरकडे येणार्या दुचाकी (एम.एच.19 सी.एस.9148) ला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील अमोल अशोक पाटील (25) व प्रवीण उर्फ अमोल आनंदा पाटील (24) यांचा मृत्यू झाला. मयत प्रवीण यांच्या पश्चात पत्नी व चार महिन्यांची मुलगी तर अमोल यांच्या पश्चात पत्नी व चार वर्षांची मुलगी आहे. हे दोघही जागीच ठार झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.