बोदवड शहरातील घटना ; अपघातानंतर कंटेनरचालकाला अटक
बोदवड- शहरातील हॉटेल अमरसमोर पायी चालणार्या हिंगण्याच्या इसमाला भरधाव कंटेनरने धडक देवून जखमी केल्याची घटना शुक्रवार, 31 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला. या अपघात प्रकरणी प्रकाश बाबूराव पाटील (30, हिंगणे, ता.बोदवड) यांनी फिर्याद दिल्यावरून कंटेनर चालक हरीष श्रीबीरसिंग यादव (27, पाळी, ता.जि.रेवाडा, हरीयाणा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चालकास अटक केली आहे. भास्कर नामदेव पाटील (50, हिंगणे, ता.बोदवड) हे पायी चालत असताना कंटेनर (एच.आर.38 डब्ल्यू.5129) ने धडक दिली. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला मात्र पाठलाग करून त्यास पकडण्यात आले व पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तपास उपनिरीक्षक दीपक ढोमणे करीत आहेत.