नियम मोडणार्यांवर वाहतूक शाखेचे लक्ष
हिंजवडी : हिंजवडीमधील मुख्य रहदारीच्या मार्गावर एकेरी चक्राकार वाहतूक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी असलेले पंक्चर बंद करण्यात येत आहेत. तसेच नो पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यांसारखे वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यातूनच मंगळवारी सकाळी विप्रो सर्कल येथे नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. हिंजवडीमधील वाहतूक कोंडी ही हिंजवडीकर आणि हिंजवडीशी संबंध असलेल्या प्रत्येक नागरिकाला भेडसावणारी समस्या आहे. त्यावर उपाय करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कित्येक वेळ सिग्नलवर थांबणे कमी झाले. तसेच गंतव्य स्थळी कमी वेळेत पोहोचणे शक्य झाले. त्यानंतर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कडक कारवाईची मोहीम सुरु केली. त्यातून एकाएका वाहन चालकावर तब्बल पाच हजारांचे देखील दंड ठोठावण्यात आले आहेत. तरीही वाहतुकीला शिस्त लागल्याचे दिसत नाही.
खासगी वाहनांना प्रवेश नाही
हिंजवडी मध्ये मोठ्या प्रमाणात आय टी कंपन्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांनी कामगारांच्या सोयीसाठी बस सेवा सुरु केली आहे. त्यामुळे कामगारांना स्वतःचे वाहन कंपनीत आणावे लागणार नाही. यातूनच काही कंपन्यांनी कामगारांच्या वाहनांना कंपनी आवारात प्रवेश देखील नाकारला आहे. जेणेकरून कामगार कंपनीच्या बसमधून प्रवास करतील. आयटी पार्क मधील वाहतूक कोंडी कमी करण्याचा हा उत्तम पर्याय असताना कामगार आणि अधिकारी स्वतःची वाहने घेऊन कंपनीत येतात. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने येतातच शिवाय प्रदूषण आणि अन्य समस्या देखील वाढत आहेत. कामगार व अधिकार्यांच्या खाजगी वाहनांना कंपनी आवारात प्रवेश बंद असल्यामुळे ही वाहने रस्त्याच्या बाजूला पार्क केली जातात. यामुळे वाहतुकीसाठी वापरला जाणारा रस्ता अरुंद होतो. पर्यायाने वाहतूक कोंडी होते. हिंजवडी मधील विप्रो सर्कल येथील रस्त्याच्या बाजूला नो पार्किंग परिसरात लावलेल्या वाहनांवर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. सर्व वाहनांना जॅमर तसेच साखळी लावून कारवाई करण्यात आली आहे.
चालकांनी नियमांचे पालन करावे
हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे म्हणाले की, वाहतुकीचे नियम वाहन चालकांनी पाळायला हवेत. ज्या कंपन्यांमध्ये बससेवा सुरु आहे, त्यांनी त्याचा वापर करावा. वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून आवश्यक त्या ठिकाणी बॅरीगेट, मार्गदर्शक फलक लावण्यात येत आहेत. नागरिकांनी केवळ नियमांचे पालन करायला हवे.