नगरसेवक राहुल कलाटेंची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : हिंजवडीत होणारी दररोजची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी फेज-3 पर्यंत फ्रीवे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वाकड उड्डाणपुलाच्या हद्दीपासून हिंजवडी फेज-3 पर्यंतचा रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावे. तसेच नियोजित उड्डाणपूलासाठी राज्य शासनाने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांनी निवेदनाद्वारे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. यावेळी नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, विक्रम वाघमारे उपस्थित होते.
हे देखील वाचा
उद्योगमंत्र्यांना राहुल कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीवरच हिंजवडी इन्फोटेक पार्क विकसित झालेले आहे. हिंजवडीमधील पायाभूत सुविधा विकसित करणेची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची देखील आहे. हिंजवडी येथे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील जोड रस्त्यांवरून दररोज सुमारे साडे तीन लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाकड येथून शिवाजीपार्क हिंजवडी येथे पोहोचण्यासाठी तब्बल दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे मोठा वेळ नाहक वाया जात आहे. तसेच इंधन खर्चामुळे राष्ट्रीय आर्थिक नुकसान होत असून प्रदुषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविणेसाठी पिंपरी महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी फेज-3 पर्यंत फ्रीवे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. परंतु
वाकड उड्डाणपुलाच्या हद्दी पासून फेज-3 हद्दी पर्यंतचा रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यामध्ये असल्याने महापालिकेमार्फत या जागेवर काम करण्यासाठी महामंडळाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात महामंडळाने परवानगी दिल्यास काम पूर्ण करून देखभाल करणे महापालिकेला सोयीचे होणार आहे. त्यासाठी हिंजवडी महापालिका हद्दीपासून ते हिंजवडी फेज-3 पर्यंतचा महामंडळाच्या मालकीचा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास आर्थिकदृष्ट्यादेखील फायद्याचे होईल. त्यामुळे हिंजवडी परिसरात काम करणार्या अभियंता वर्गाचा व वाकड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी व नाशिक फाटा परिसर, औंध या परिसरात राहणार्या नागरिकांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.