‘हिंदु धर्मजागृती‘ची 61 सभा जळगाव होणार
जळगाव । हिंदू जनजागृती समितीतर्फे रविवार 19 नोव्हेंबर रोजी ‘हिंदु धर्मजागृती‘ सभेचे आयोजन शिवतीर्थ मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मजागृती सभेत वक्तेम्हणून हिंदु विधीज्ञ परिषद राष्ट्रीय सचिव अॅड. संजू पुनाळेकर, माजी सल्लागार केंद्र शासन सांस्कृतीक विभाग प्रा. रामेश्वर मिश्रा, प्रखर हिंदुतत्ववादी सुधाकर चर्तुवेदी, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव हे उपस्थित राहणार आहेत. या धर्मजागृती सभेबाबत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी दै. जनशक्तीशी साधलेला संवाद.
हिंदु जनजागृती समितीची स्थापना कधी झाली ?
श्री. घनवट – हिंदु जनजागृती समितीची स्थापना 2002साली झाली. 2008 नंतर संपूर्ण भारतात हिंदु जनजागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळजवळ 13 राज्यांमध्ये 1270 हून अधिक ठिकाणी या धर्मजागृती सभा घेतल्या आहेत. 15 लाखांहून अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सांगायचे झाले तर भुसावळ, जळगाव शहर, चोपाडा त्याच बरोबर नंदुरबार, धुळे अशा जिल्ह्यांमध्ये देखील सभा घेतल्या आहेत. आतापर्यंत 60 हून अधिक सभा घेतल्या आहेत. ही 61वी सभा आहे.
जळगाव जिल्ह्यात सभा घेतांना काय अनुभव आला ?
श्री. घनवट – जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये धर्मजागृती सभा घेतांना काही गोष्टी समोर आल्या. यात जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत. त्याच बरोबर काही वर्षांपूर्वी या सभांची सुरूवात झाली. या ठिकाणापासून जवळ असलेले शिरसोली या गावी अवैधरित्या कत्तलखाना सुरू होता. जवळच असलेली एकचक्रा नगरीत पांडव वाडा काही धर्मधांनी बळकावून लावला होता. या धर्म जागृतीच्या माध्यमातून विषय हाती घेऊन लोकांना आवाहन करत आंदोलन केले. या आंदोलनाच्या दुसर्या दिवशी शिरसोलीचा कत्तलखाना बंद पडला. पांडव वाडा सर्वांसाठी खुला झाला.
लव्ह जिहादबद्दल आपली भूमिका काय ?
श्री. घनवट – काही महिन्यापूर्वी या ठिकाणी एका पोलीस हवलदार याने एका हिंदु मुलीला लव्ह जिहादच्या नावाखाली फसवले आहे. आज केरळ सारख्या उच्च शिक्षीत असलेल्या एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षांचे शिक्षण घेणार्या हिंदु मुलींना फसवले जात होते. आज उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात सुध्दा लव्ह जिहाद नावाची गोष्ट अस्तित्वात आहे याच्या विषयीचर्चा होते. राजस्थान हायकोर्टानेतर याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. हे षडयंत्र अंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. हे कुठेतरी थांबविण्यात यावे यासाठी रणरागिणी शाखेची स्थापना केली आहे. तसेच हिंदू बांधवांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे. या धर्मांतराविरोधात जनजागृती करण्यात येत आहे.