मुंबई । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ग्राम गीताचार्य यांच्या तुकाराम दादा यांच्या प्रतिमा वापरून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न अमरावती जिल्ह्यात झाला. यासंबंधीचे निवेदन 26 मार्च 2017 रोजी प्राप्त झाले असून संबंधित व्यक्तींवर 15 दिवसांत कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
अमरावती जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ग्राम गीताचार्य तुकाराम दादा यांच्या प्रतिमा एका छोट्या पुस्तिकेवर छापण्यात आल्या. तसेच त्या छोट्या पुस्तिकेच्या शेवटी येशू ख्रिस्ताची कवने छापण्यात आली. मात्र, ही कवने संत तुकडोजी महाराजांच्या नावे छापण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांनी लक्ष्यवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेत केली. त्यावर अतुल भातखळकर, जयप्रकाश मुंदडा, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री केसरकर यांनी वरील माहिती दिली.
साधारणत: देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात धर्मांतर करण्यासाठी विविध आमिषांचा वापर केल्याच्या घटना फारच तुरळक स्वरूपात घडल्या आहेत. त्याचबरोबर धर्मांतरण विरोधी कायदा केंद्र सरकारने तयार केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वी तयार केला नव्हता. परंतु, राज्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय दंड विधान संहिता कलम 295 आणि 298 यामध्ये सुधारणा करून राज्य सरकार स्वत:ची नियमावली तयार करणार आहे. त्यामुळे खोटी अमिषे दाखवून धर्मांतर करण्याच्या प्रकारांना आळा बसवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.