हिंदू-मुस्लिमांच्या सामंजस्यामुळे राज्यात शांतता : मंत्री धनंजय मुंडे

जळगाव शहरात ‘दैनिक जनशक्ती’च्या नूतन कार्यालयाचे थाटात उद्घाटन

जळगाव : स्वार्थाच्या राजकारणामुळे भोंग्याचा वाद पेटवण्यात आला. यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले मात्र या अत्यंत संवेदनशील विषयावर हिंदू व मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या सामंजस्य भावनेमुळे राज्यातील शांतता अबाधित राहिली, असे स्पष्ट मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी येथे व्यक्त केले. जळगाव शहरातील ‘दैनिक जनशक्ती’च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्याहस्ते शनिवार, 7 रोजी सायंकाळी पाच वाजता छोटेखानी समारंभात थाटात पार पडले. याप्रसंगी त्यांनी भोंग्याच्या विषयावर परखड मत व्यक्त केले.

भोंगे पुराण स्वार्थासाठी
ते पुढे म्हणाले की, राज्यात सुरु असलेले भोंगे पुराण हे हिंदू धर्मासाठी नसून फक्त स्वार्थासाठी असून हनुमान चालिसा मातोश्रीसमोर किंवा मशिदीसमोर म्हटल्याने हनुमानजी प्रसन्न होणार आहेत का ? जर तसे होत असेल तर आम्हीही हनुमान चालिसा म्हणू पण हा फक्त काही लोकांचा स्वार्थाच्या राजकारणासाठी भोंग्याचा वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजली जात असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
या छोटेखानी कार्यक्रमास जळगावच्या महापौर जयश्री महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील, ‘जनशक्ती’चे मुख्य संपादक यतीन ढाके, निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी, मुख्य व्यवस्थापक धन्यकुमार जैन व जनशक्ती परीवारातील सदस्य उपस्थित होते.

स्व. कुंदनदादांच्या आठवणींना उजाळा
मंत्री धनंजय मुंडे यांनी स्व.कुंदनदादा ढाके यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, स्व.कुंदनदादा हे आरोग्याच्या बाबतीत अत्यंत जागरुक होते. त्यांचे खान-पान, व्यायाम, नित्य-नियमाने काळजीपूर्वक व्हायचा मात्र, नियतीने त्यांना आपल्यापासून दूर केले. त्यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला ताब्यात घेतल्यानंतर नवी उंची मिळवून दिली. त्यांनी सुरू केलेला हा वारसा त्यांचे मोठे बंधू यतीनदादा ढाके पुढे नेत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.