हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी भुसावळात 13 रोजी ‘हिंदू धर्मजागृती सभा’

0

भाग्यनगरचे आमदार टी.राजासिंह मार्गदर्शन करणार

भुसावळ- हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवार, 13 मे रोजी शहरात हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले असून शहरवासीयांना भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार टी. राजासिंह (राजाभैया) मार्गदर्शन करतील, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत दिली. घनवट पुढे म्हणाले, ‘हिंदूंवर होणार्‍या अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे, धर्मशिक्षण, धर्माचरण, धर्मरक्षण याद्वारे हिंदूंना संघटीत करणे आणि ‘हिंदू राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करण्यासाठी समितीच्या वतीने देशभरात अशा प्रकारच्या हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात येत असल्याचे घनवट म्हणाले.

टीव्ही टॉवर मैदानावर होणार सभा
समिती गेल्या 15 वर्षांपासून समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अखंड कार्यरत असून आजवर समितीच्या वतीने देशभरात सहस्रो सभांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले आहे. यंदा भुसावळ येथे रविवार, 13 मे रोजी सायंकाळी सहा वाजता जामनेर रोडवरील टी.व्ही.टॉवर मैदानावर हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परीषदेला घनवट सनातन संस्थेचे संत सदगुरू नंदकुमार जाधव आणि समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते.

सभास्थळी 11 जागृतीपर फलकांचे प्रदर्शन
भुसावळमध्ये प्रथमच येणार्‍या राजा भैया यांच्याविषयी अत्यंत कुतुहलाचे वातावरण असून त्यांच्या स्वागतासाठीच हजारोंच्या संख्येने जनसमूदाय उपस्थित रहाणार आहे. या सभेला वक्ता म्हणून राजा भैया यांच्यासह समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, सनातनचे संत सदगुरू नंदकुमार जाधव आणि समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर या उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी दिली. सभास्थळी गंगा रक्षापासून गोरक्षणापर्यंत 11 प्रकारच्या विविध विषयांवरील जागृतीपर फलकांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच सनातनची अध्यात्मिक ग्रंथसंपदाही येथे उपलब्ध असणार आहे. ‘भारतीय संस्कृती अभिमान जोपासा !’ याविषयी जागृती करणारा बालकक्षही लावण्यात येणार आहे.