नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजपूत संघटनांकडून विरोध होत असतानाही पद्मावत चित्रपट गुरुवारी देशभरातील सुमारे 7 हजार पडद्यांवर प्रदर्शित झाला. पद्मावतीचे सर्व शो हाऊसफुल्ल सुरू होते. काही शहरांमध्ये तिकीट दर 800 ते 2000पर्यंत पोहोचले होते. तर दुसरीकडे चित्रपटाच्या विरोधात महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश व दिल्ली आदी राज्यांत हिंसाचार सुरू होता. रास्थिानमधील आगामी निवडणुकांसाठी करणी सेना आणि भाजपने हा विषय धुमतस ठेवल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, राजपूत संघटनांनी गुरगावमध्ये खासगी स्कूल बसवर दगडफेक व लाठ्यांनी हल्ला केला. बसमधील 20-25 मुले सीटखाली लपून बसली होती. भेदरलेली मुले रडत-ओरडत असताना जमाव दगडफेक करतच राहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर करणी सेनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दावोस येथे प्रतिक्रिया देताना हे कृत्य चूकीचे असल्याचे म्हटले. पद्मावत संदर्भात न्यायालयाचा आदेश न पाळल्याने मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हरियाणा राज्यांविरूद्ध अवमान याचिकाही सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी दाखल करण्यात आली.
सगळी थिएटर्स हाऊसफुल्ल!
मुंबई : करणी सेनेच्या हिंसक आंदोलनाचा अडथळा प्रेक्षकांना सतावत असतानाच त्यांना त्यांना आणखी एक अडथळा पार करावा लागत आहे. तो म्हणजे तिकीट दराचा. अनेक मोठ्या चित्रपटगृहात पद्मावतचे एक तिकीट अडीच हजारांना विकले जात आहे. मल्टिफ्लेक्स मालकांना आपले उखळ पांढरे करून घेण्याचा पुरेपुर प्रयत्न चालवला आहे. भाजप आणि करणी सेनेने हा उपदव्याप राजस्थानमधील आगामी निवडणुकांसाठी चालवल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा अनेक शहरांत तिकीटांचे दर हजाराच्या घरात आहेत. राजधानी दिल्लीतदेखील हे दर 800 ते 2000 रूपयांपर्यंत आहेत. काही ठिकाणी तर तिकीटाच्या दरांनी अडीच हजारचा आकडा गाठला आहे. तरीही तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग थांबलेले नाहीये. पद्मावतची तब्बल 90टक्के तिकिटे अॅडव्हान्स बुकींगमध्येच खपली आहेत. तिकिटांचे अव्वाच्या सव्वा दर असूनही सगळी थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत.
महाराष्ट्रातही पडसाद
औरंगाबाद शहरात राजपूत करणी सेनेने गुरूवारी धरणे आंदोलन केले. जालन्यात बुधवारी रात्री रत्नदीप टॉकीजवर दगडफेक करून टायर जाळण्यात आले. पुण्यात वडगाव बुद्रुक येथील बंगळुरू हायवेवर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत वाहने फोडली. यामुळे करणी सेनेच्या 25 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईमध्ये निदर्शने करणार्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अकोल्यात युवकांनी शहरातून दुचाकी फेरी काढली. चिखलीत पोस्टर्स जाळले तर मोताळ्यात रास्ता रोको करण्यात आला.
4 राज्यांत प्रदर्शनावर बंदी
सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व गोव्यात गुरुवारी पद्मावत प्रदर्शित होणार नाही. चित्रपटगृह मालकांच्या मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने या राज्यांत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील 75 टक्के चित्रपट गृहमालक या संघटनेशी सलग्न आहेत.
देशभरात हिंसाचाराच्या घटना
गुरगावमध्ये अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीत दिलशाद गार्डनमध्ये आंदोलकांनी स्कूल बस अडवल्या होत्या. एका पालकाने सांगितले की, गुरगावमध्ये परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु केव्हा काय होईल, हे सांगणे कठीण आहे. उदयपूर एडीएम एससी शर्मा यांनी सांगितले की, खासगी अणि शासकीय शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात घूमर डान्स न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हरियाणात गुरगाव येथे 2 महामार्ग आंदोलकांनी रोखून धरले होते. त्यांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली. तसेच एक बस जाळली. येथील सहा जिल्ह्यांत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये करणी सेनेच्या चित्तोडगड प्रमुखाला पोलिसांनी ताब्यात घेतले. जयपूरमध्येही रास्ता रोको करण्यात आला. उत्तर प्रदेशात मीरतमध्ये पीव्हीएस मॉलवर दगडफेक करण्यात आली. तर मथुरेत रेल्वे रोको करण्यात आला. लखनऊतही अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. गुजरातेत हिंसाचार रोखण्यासाठी 20 हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. निमलष्करी दलासह 20 हजारांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशच्या भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन येथे निदर्शने करण्यात आली. दिल्लीत एका मल्टिप्लेससमोर वाहनांची तोडफोड झाली.
न्यायालय अवमानप्रकरणी याचिका
पद्मावत चित्रपटाबाबत न्यायालयाने दिलेले आदेश न पाळल्याने मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हरियाणातील राज्य सरकारविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी न्यायालय अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त पद्मावत सिनेमाला प्रदर्शित करण्यापासून रोखण्यात यावे, यासाठी राजस्थान व मध्यप्रदेश सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने यापुवीच फेटाळून लावली होती. न्यायालय आपल्या निर्णयात काहीही बदल करणार नाही, तेव्हा राज्यांनी आदेशाचे पालन करावे. तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व अखिल भारतीय क्षत्रिय महासभेलादेखील सर्वोच्च न्यायालयाने खडसावले होते. हा चित्रपट इतिहासाशी छेडछाड करत नाही. तज्ज्ञांनी हा सिनेमा पाहिला असून, तशी सूचनादेखील प्रदर्शित होणार आहे. राज्यांना काही आपत्ती असेल तर त्यांनी लोकांनी हा सिनेमा पाहू नये, असे आवाहन करावे. आम्ही जो आदेश दिला आहे, त्याचे पालन सर्व राज्यांना करायचे आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून कुणीही या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले असताना करणी सेनेने पुन्हा हिंसाचार घडवून आणल्याने आता करणी सेनेविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल झाली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने या हिंसाचारास राज्य सरकार जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. कायदा व सुव्यस्था राखणे हा राज्यांचा विषय असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
करणी सेनेचा भन्साळींवर आरोप
करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्रसिंह कालवी यांनी हिंसाचारात हात असल्याचा इन्कार करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाच जबाबदार ठरवले आहे. कानपूरच्या क्षत्रिय महासभेने पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाक छाटणार्याला कोट्यवधींचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
पुण्यात झळकला पद्मावत
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपट गुरूवारी पुण्यातील विविध थिएटर आणि मल्टिफ्लेक्समधील सुमारे 90 स्क्रीनवर झळकला. विशेष म्हणजे चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रत्येक शो हाऊसफुल्ल होता. सर्व थिएटरबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या पुण्यात या चित्रपटाचे शो व्यवस्थितपणे सुरू असून तरूणांनी गर्दी केली आहे. तसेच चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही, उलट रजपूत समाज, त्यांचा इतिहास उत्तम पद्धतीने मांडला आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
25 जणांविरोधात गुन्हा दाखल-
दिग्दर्शक संजय लिला भन्साळी निर्मिती पदमावत चित्रपटास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर, रजपूत करणी सेनेच्या सुमारे 20 ते 25 कार्यकर्त्यांनी पुणे-बंग्लोर हायवेवर वडगाव ब्रिज येथे रास्तारोको करत वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी महेश लक्ष्मण भापकर (वय- 30, रा. कल्याण, जि. ठाणे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी करणी सेनेच्या संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन 15 जणांना अटक केली आहे.
आम्ही फक्त वाहनांची तोडफोड केली
अखिल राजस्थानी समाज संघ, पुणेचे अध्यक्ष ओमसिंग भाटी यांनी सांगितले की, पद्यावत चित्रपटाला विरोध म्हणून वडगाव धायरी परिसरात आंदोलन करणार्या आमच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक करुन त्यांना मारहाण केली. कार्यकर्त्यांनी वाहनांच्या काचा फोडल्या, हवा सोडली मात्र कोणत्या व्यक्तीस मारहाण केली नाही अथवा लुटमारी केली नाही. तरीही पोलीसांनी कार्यकर्त्यांवर लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिक्रिया
भाजप देशभरात आग लावतोय
पद्मावतच्या विरोधात लहान मुले आणि महिलांवर होणार्या हल्ल्यांचा काँग्रेस निषेध करत आहे. लहान मुलांच्या विरोधात हिंसाचार कदापी सहन केला जाणार नाही. तो कुठल्याही परिस्थितीत योग्य ठरवता येणार नाही. भाजप सार्या देशात आग लावण्यासाठी हिंसाचार आणि द्वेषचा वापर करत आहे.
-राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस
ही लज्जास्पद बाब
गुरगावमध्ये लहान मुलांच्या शालेय बसवर दगडफेक करण्याच्या घटनेचा मी निषेध करतो. या घटनेने मी रात्रभर झोपू शकलो नाही. ही आपल्यासाठी लज्जास्पद बाब आहे.
-अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्लीअसे चित्रपट येऊ नयेत
कांग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले, कुठल्याही जाती-धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे चित्रपट बनवूच नयेत.
-दिग्विजय सिंह, काँग्रेस नेतेपद्मावतप्रकरणी शेपूट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पद्मावतला विरोध करणार्यांपुढे सहजपणे मान तुकवत आहेत. फक्त मुस्लीमांनाच दाखवायला त्यांच्याकडे 56 इंचाची छाती आहे. जेव्हा चित्रपटात राणी पद्मावतीबाबत काही चुकीचे दाखवण्यात आले तर 4 टक्के राजपूत चित्रपटाविरोधात उभे राहिले.
-असदुद्दीन ओवेसी, एमआयएमअसे हल्ले खपवून घेणार नाही
पद्मावतच्या विरोधात शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. लहान मुले आणि महिलांवर करणी सेनेकडून झालेले हल्ले कुठल्याही परिस्थितीत मोदी सरकार खपवून घेणार नाही
-सुरेश प्रभु, केंद्रीय मंत्रीअसे चित्रपट बनवू नये
अशा प्रकारचे सिनेमे जुन्या घावांना उकरून काढतात. त्यामुळे, अशा प्रकारचे चित्रपट बनवलेच जाऊ नये. या चित्रपटाचे ऐतिहासिक मूल्य काय? शून्य. या चित्रपटाचा इतिहासाशी काडीमात्रही संबंध नाही. राहुल गांधींनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी.
-सुब्रह्मण्यम स्वामीजनतेला काय वाटते, जाणून घेणार
पद्मावत चित्रपट सुरू करण्यापूर्वी नर्व्हस होतो. कारण, लोकांना माझ्या भूमिकेविषयी जास्त माहिती नाही. माझ्यासाठी हा चित्रपट अत्यंत महत्वाचा आहे. मला या भूमिकेवर अभिमान आहे. आम्ही सर्व काही केले आहे. आता जनतेला काय वाटते हे जाणून घेण्याची वेळ आली आहे.
-शाहिद कपूर, अभिनेताजल्लोष साजरा करण्याची वेळ
ही वेळ आमच्यासाठी जल्लोष साजरा करण्याची आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. या चित्रपटावरून खूप काही झाले आहे. आता त्याच्या प्रदर्शनाची वेळ आहे. यावरून मी अतिशय उत्साही आहे.
-दीपिका पादुकोन, अभिनेत्री