हिंस्र प्राण्यांचे हल्ले वाढले; तळोदा वनविभाग ठरला

0

तळोदा:हिंस्र प्राण्यांचे दिवसेंदिवस हल्ले वाढतच आहे. तरीसुद्धा तळोदा वनविभाग मात्र निष्क्रिय दिसून येत आहे. त्यामुळे आता अस्वल/बिबट्या अशा हिंस्र प्राण्यांना पकडण्यासाठी बाहेगावाहून एक्स्पर्ट मागवावे, अशी मागणी तळोदा तालुक्यातील मोहीदा येथील ग्रामस्थांनी तळोदा येथील तहसीलदार पंकज लोखंडे यांच्याकडे केली आहे.
मोहिदा गावाच्या परिसरात बिबट्याचा रहिवास आढळून आलेला आहे. परंतु वनविभागाच्या सांगण्यावरून या भागामध्ये अस्वलाचाही रहिवास असल्याचे समजते दरम्यान काही दिवसांपूर्वीच मयत झालेल्या कै.शरद खंडु चव्‍हाण यांच्यावर अस्वलाने हल्ला केला असल्याचे वनविभाग दावा करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हे संभ्रमावस्थेत असल्याने बिबट्या असो वा अस्वल त्यात वन विभागाने तात्काळ या हिंस्र प्राण्यांना बंदिस्त करावे.

बिबट्याचा मुक्त संचार
मागील वर्षभरात वेळोवळी मोड, मोहिदा, बोरद, प्रतापपूर, रांझनी आदी गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आढळून आलेला आहे. त्याबाबत तळोदा वनविभागाला वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदन व तक्रारी देऊन वनविभाग सुस्त आहे. परंतु आतापर्यंत त्याबाबत वनविभागामार्फत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कै.शरद खंडू चव्हाण यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दरम्यान बिबट्या व अस्वल या प्राण्यांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. पुढेही वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यांना पकडण्यासाठी किंवा त्यांना बंदिस्त करण्यासाठी बाहेरगावाहून एक्सपोर्ट मागविण्यात यावे, जेणेकरून पुढील अनर्थ टळेल.

हिंस्र प्राण्यांना जेरबंद करा

तळोदा वनविभागाने फक्त देखावा म्हणून पिंजरे, कॅमेरे लावण्याचे खेळ सुरू ठेवला आहे. तीन दिवस उलटूनही संबंधित शेतकरी कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. तरी लवकरात लवकर या हिंस्र प्राण्यांना जेरबंद करण्यात यावे, अन्यथा मोहिदा येथील ग्रामस्थ भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर गोरख रावडे, दिनेश चव्हाण, सचिन भोसले, रमेश पाटील, सतीश चव्हाण, रोहिदास चव्हाण, कृष्णा शिंदे, अर्जुन पाटील यांच्यासह अनेक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.