हिम्मत असेल तर उमेदवारी जाहीर करा

0

पुणे । राष्ट्रवादीने घेतलेला मेळावा हा शेतकरी मेळावा नसून तिकीट मेळावा होता, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे. सोबतच 2019 ला आपणच उमेदवार असल्याचे सांगत हिम्मत असेल तर भरणे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, असे आव्हान देखील त्यांनी दिले आहे.
रविवारी आ. दत्तात्रय भरणे यांचे आव्हान स्वीकारून भरणेवाडी येथे आयोजित विविध विकास कामांच्या भूमीपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी या कार्यक्रमाची तयारी केलेल्या गावातील तरुणांची भली मोठी यादी वाचून दाखवत तरुणांची आपल्या मागे असलेली ताकद दाखवून देत गर्दीचा उच्चांक मोडल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. यावेळी त्यांनी आमदार भरणे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले.

भरणे ताटाखालचे मांजर
पाटीलम्हणाले, यांनी 4 वर्षात एकदाही सणसर कटमधून शेतीसाठी आवर्तन आणले नाही. बारामती तालुक्याला दुसर्‍यांदा पाणी सुटले तरी इंदापूर तालुक्याला मात्र एकदाही नीट भिजणे झाले नाही. हिम्मत असेल तर काटेवाडीचे पाणी बंद करा, असे आव्हान त्यांनी दिले. आ. भरणे पवारांच्या ताटाखालचे मांजर आहेत. डोळे वटारले की गप्प बसतात, असा टोला लगावला. शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली तिकीट मेळावा आयोजित केला. यासाठी महिनाभर आदींपासून मटण, मासे याच्या टनावर याद्या केल्या. आपण कोणतीही गाडी न लावता, कोणत्याही अधिकार्‍याकडून पैसे न घेता, बाहेरचे पुढारी न आणता कार्यक्रम घेतल्याचे सांगत अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवाढीच्या शेतकरी मेळाव्याला कसे लोक जमवले, याची कल्पना उपस्थितांना दिली. याउलट पवार साहेब या मेळाव्याला आले नाहीत, याचेही खापर आपल्यावर फोडल्याचा आरो त्यांनी केला.

मीच 2019 चा उमेदवार
आमदार भरणे फक्त तालुक्यातील पेपरमधील बातम्या वाचून खूश होतात. आपली उंची किती? आपली ताकद काय? हे तपासण्याचाही सल्ला देऊन यापुढे समोरचा वागेल तसे वागण्याची तयारी केल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. इंदापुरात काँग्रेस राष्ट्रवादीचा खरा शत्रू असल्याच्या भरणे यांच्या विधानावर बोलताना पाटील म्हणाले, हिम्मत असेल तर मुंबई दिल्लीतील नेत्यांना हे सांगा. सध्या राज्यात, देशात काँग्रेसला वातावरण अनुकूल आहे. यामुळे 2019ला मीच उमेदवार आहे. हिम्मत असेल तर आ. भरणेंनी स्वतः उमेदवारी जाहीर करावी, असे आव्हान देत आम्ही रिंगणात उतरलो. आगामी लोकसभेला तसेच विधानसभेला काय करायचे ते बघू असा सज्जड दम त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांना दिला.

आम्ही दमदाटी अरेरावीची भाषा केली नाही
वीस वर्षात काय केले हे विचारणार्‍या आ. भरणे यांच्यावर त्यांनी यावेळी सडकून टीका करत खुले आव्हान दिले. आम्ही 20 वर्षे सत्तेत होतो. मात्र दमदाटी, अरेरावीचे भाषा कधी वापरली नाही. हे मोकळ्या नदी पात्रात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना शिव्या देऊन आले. याची आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आहे. आपण मंत्री असताताना यांचे 20 वर्षे चोरून सायफन सुरू असल्याचा टोला यावेळी पाटील यांनी लगावला. इंदापूर तालुक्यात सध्या खोट्या केसेस दाखल करून घराघरात भांडण लावण्याचा उद्योग सुरू असल्याचा गंभीर आरोप करून उद्याही काही जणांवर कोट्या केसेस दाखल होण्याची शंका त्यांनी उपस्थित केली. मात्र, यापुढे यांच्या आरोपांना आपण भीक घालणार नसून, सत्ता म्हणजे काय बापदांद्याची इस्टेट समजून वागण्याचे कारण नसल्याचे सांगत खुनशिचे राजकारण त्यांनी सुरू केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.