हिरे खरेदीदार आयकरच्या रडारवर

0

पीएनबी घोटाळा

मुंबई : नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून रोखीने हिरे खरेदी करणारे देशातील 50 ख्यातनाम उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटी आता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. नीरव मोदीच्या कार्यालयांवरील छाप्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे हे सर्व जण आता चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत.

नोटाबंदीच्या काळात हिरे खरेदी
पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी हा मुख्यसूत्रधार आहे. या प्रकरणी सीबीआय आणि ईडीने नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. नीरव मोदी कुटुंबीयांशी संबंधित 29 मालमत्ता आणि 105 बँक खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली असून, त्याच्या घर व कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. या छाप्यांमधून तपास यंत्रणांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. देशातील प्रसिद्ध उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटींनी नीरव मोदीकडून रोखीने हिरे खरेदी केले आहेत. हे सर्व व्यवहार नोटाबंदीच्या काळात झाले होते, असे सूत्रांनी सांगितले.