हिवाळ्यात खड्ड्यात अचानक ‘उकळतं’ पाणी!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या भोसरी येथील सहल केंद्राच्या बाजूच्या एका खड्ड्यातून अचानक उकळत गरम पाणी येऊ लागलेय. हिवाळ्यात गरम पाणी येऊ लागल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हिवाळ्यात गरम पाणी आल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातारण देखील पसरले आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. दरम्यान, मोबाईलसह विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून याबाबतचे वृत्त पसरल्याने उत्सुकतेपोटी शहरवासियांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी किती गरम आहे हे समजण्यासाठी अनेकजण प्लास्टिक बाटल्या घेवूनच येत होते. याशिवाय हातातील वाहनांच्या चाव्याही लोक बुडवत होते.

प्लास्टिक बाटल्या पिघळल्या
सहल केंद्र उद्यानात परिसरातील नागरिक सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी येतात. बुधवारी सकाळी भोसरी येथील रहिवासी संभाजी शंकर लांडगे या सहल केंद्रात फेरफटका मारण्यासाठी आले असता, उद्यानाच्या एका कोपर्‍यात वाफ निघाल्याचे दिसले. हिवाळ्याचे दिवस असल्याने धुक्यामुळे वाफ असेल असा अंदाज बांधत त्यांनी उद्यानाला एक फेरी मारली; परंतु वाफेत वाढ झालेली दिसली. वाफेच्या ठिकाणी बघितले असता, पाणी गरम होऊन त्यातून वाफा येत असल्याचे दिसले. पाण्यात बाटली टाकली असता बाटली पिघळल्याचे आढळले. त्यामुळे पाणी अचानक गरम झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होऊ लागले. गरम पाण्याचा झरा लागला असे समजून शेकडो नागरिकांनी उद्यानाला भेट दिली.

नेमक्या कारणांचा उलगडा नाहीच
दुपारच्या वेळी उद्यानातील कर्मचार्‍यांनी गरम पाण्याच्या ठिकाणी खोदले असता त्याखाली उद्यानाला वीज पुरविणारी केबल असल्याचे आढळून आले. परंतु ती केबल मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने त्याचा पाणी गरम होण्याशी काहीही संबंध नसल्याचे उद्यानाचे अधिकारी अशोक नाईक यांनी सांगितले.

कदाचित विद्युत दाहिनीचा परिणाम
हिवाळ्यात खड्यातून गरम पाणी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. आश्‍चर्याबरोबर नागरिक भिती देखील व्यक्त करत आहेत. बागेच्या बाजूला विद्युतदाहिनी आहे. विद्युतदाहिनीमध्ये गरम पाणी वापरतात. त्या पाण्याचे आउटलेट बागेच्या बाजूने काढण्यात आले आहे. त्या गरम लाईनचा पाईप फुटून गरम पाणी बाहेर येण्याची शक्यता सोनू फुगे या कर्मचार्‍याने वर्तविली आहे. उद्यान प्रशासन कामाला लागले असून अद्याप नेमके कारण समजू शकले नाही.