मुंबई । जगभरातील क्रिकेटप्रेमींना सर्वात आवडीची स्पर्धा असलेली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल लवकरच सुरू होत आहे. भारत तसेच भारताबाहेरचे क्रिकेटपटू या सामन्यांमध्ये सहभागी असतात. लीगमधील सामन्यांकडे जसे सर्वांचे लक्ष असते त्याचप्रमाणे सर्वांचे लक्ष त्याच्या उदघाटन सोहळ्याकडेदेखील असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आयपीएल 2018 चा उद्घाटन सोहळा नयनरम्य असणार आहे. यावर्षी या सोहळ्यात कोणते कलाकार हजेरी लावणार आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा यंदा खूप स्पेशल असणार आहे. कारण या सोहळ्याचे नृत्यदिग्दर्शन आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शक शामक दावर करणार आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन या सोहळ्यात परफॉर्म करणार आहे.
नृत्यदिग्दर्शक शामक दावर हे त्यांच्या उत्तम नृत्यशैली आणि नृत्यसंदर्भातील अनोख्या प्रयोगासाठी ओळखले जातात. शामक डान्स स्टाईल ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अभिनेता हृतिक रोशन हा देखील त्याच्या हटके डान्समुळेच ओळखला जातो. शामक आणि हृतिक या दोघांनी याआधी मधूम 2फ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलेले आहे. तसेच अनेक अवॉर्ड्स शो मध्येही दोघांनी एकत्रितपणे काम केले आहे. नृत्यदिग्दर्शक शामक दावरने पुन्हा एकदा हृतिकसोबत काम करत असल्याची बातमी त्याच्या सोशल मीडियावरून नुकतीच दिली आहे आणि म्हणूनच यावर्षी हृतिक आणि शामक हे दोघे एकत्र येणार ही बातमीच आपल्याला एका शानदार सोहळ्याची चाहूल देणारी वाटते. दिल तो पागल है या चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात करणारे शामक दावर यांनी अनेक चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.