नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शासनाच्या विविध विभागाच्या वेबसाईट हॅक करून त्याद्वारे सामाजिक विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न करणार्या आयएसआय प्रायोजित हॅकर्सचे जाळे उद्ध्वस्त केले आहे. आतापर्यंत केलेली अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. या प्रकरणी दोन काश्मिरी तरुणांना अटक करण्यात आली आहे. या कृत्यात इतरही अनेक गुंतले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून इतर संशयितांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 124 ए आणि आयटी कायद्याच्या कलम 66 अन्वये, त्याच प्रमाणे आयपीसी कलम 120 ब अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांपैकी शाहिद मल्ला हा बीटेकचा विद्यार्थी आहे, तर दुसरा अदील हुसेन हा पंजाबमधील एका विद्यापीठाचा बीसीएचा विद्यार्थी आहे. हे दोघे टीम हॅकर्स थर्ड आय या राष्ट्रविरोधी हॅकिंग ग्रुपचे सदस्य आहेत.