हेल्पलाईनबाबत रेल्वे सुरक्षा बलातर्फे जनजागृती

0

वर्षभरात दहा लाख प्रवाशांशी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी साधणार संवाद ; रेल्वे प्रवासात अडचण आल्यास 182 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

भुसावळ :- रेल्वे प्रवासात येणार्‍या अडचणीसंदर्भात तातडीने मदत मिळण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने 182 क्रमांक सुरू केला आहे तर या संदर्भात रेल्वे स्थानकावर जनजागृती करण्यात येत आहे. वर्षभरात तब्बल दहा लाख प्रवाशांशी संवाद साधण्यावर रेल्वे सुरक्षा बलाचा भर असल्याची रेल्वे स्थानक निरीक्षक व्ही.के.लांजीवार यांनी दिली.

दररोज 300 प्रवाशांचे उद्दिष्ट
प्रवाशांना प्रवास करतांना येणार्‍या अडचणीवर मात करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने भारतीय रेल्वेत 182 क्रमांक सुरू केला असून जनजागृतीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 फेब्रुवारीपासून ‘मिशन 10 लाख’ सुरू करण्यात आले आहे. यात संपूणॅ विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकावरील आरपीएफ अधिकार्‍यांना दररोज 300 प्रवाशांना भेटून हेल्प 182 क्रमाकांसाठी जनजागृती केली जात आहे. प्रवाशांना गाडीत काही त्रास होत असल्यास त्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने 182 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. हा क्रमांक जरी रेल्वे प्रशासनाने सुरू केला असला तरी त्याची प्रवाशांमध्ये जागृती झाली नसल्याने जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली.

प्रवाशांना संपर्क साधण्याचे आवाहन
गुरूवारी आरपीएफतर्फे जनजागृतीवर भर देण्यात आला. यावेळी रेल्वे स्थानकावर आरपीएफ निरीक्षक विनोदकुमार लांजीवार यांनी प्रत्येक प्रवाशांना 182 क्रमांक मोबाईलवरून लावून त्यांना तत्काळ पलिकडून प्रतिसाद मिळाल्याचे दाखविले. संपूर्ण विभागात ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच विभागातील प्रत्येक स्थानकावर 182 क्रमांकाची जनजागृती करण्याचे काम करण्यात आले आहे. प्रवाशांना त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी 182 क्रमांक डायल करून समाधान मिळणार असल्याने प्रवाशांनी या क्रमांकाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त अजय दुबे यांनी केले आहे.