हेल्टेम न वापरण्याचा पुणेकरांचा कंटाळा बेततो जीवावर
पुणे : हेल्मेट न वापरण्याचा कंटाळा करण्यात पुणेकर हे जगात अव्वल आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी हटकले तरी ते त्यांच्याशी खास पुणेरी स्टाईलमध्ये हुज्जत घालत बसतात. परंतु, या कंटाळ्यामुळेच सरत्या वर्षभरात सर्वाधिक पुणेकरांचे बळी गेले आहेत. वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, वर्षभरात 195 दुचाकीस्वार हेल्मेटअभावी मृत्युमुखी पडले असून, 374 जण गंभीर जखमी झालेत व त्यांना अपंगत्व आले, तर 205 जण किरकोळ जखमी झाले आहेत. यापैकी अनेकजण तर कोमात गेल्याची धक्कादायक माहितीही वाहतूक शाखेच्या वरिष्ठांनी दिली. त्यामुळे हेल्मेट न वापरणे किती गंभीर बाब बनली आहे, अन् त्याकडे दुर्लक्ष कसे जीवावर बेतत आहे, ही बाब अधोरेखित होत आहे.
हेल्मेटसक्तीविरोधात पुणेकरांचा कायमच नकारात्मक सूर
वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाते. परंतु, ही कारवाई करताना वाहतूक पोलिसांशी तासंतास हुज्जत घालण्याचे प्रकारही चौकाचौकात घडत आहेत. वास्तविक पाहाता, हेल्मेट वापरणे हे दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे असते. काही दुर्देवी घटना घडली तर त्यांच्याच जीवितास धोका निर्माण होतो. सरते वर्ष 2017 मधील आकडेवारी लक्षात घेतली तरी ही बाब प्राकर्षाने लक्षात येईल. मावळत्या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुणे शहरात हेल्मेटअभावी 195 दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले आहेत. तर 374 दुचाकीस्वार हे जायबंदी झाले असून, पैकी अनेकजण कोमात असल्याची माहितीही वाहतूक शाखेला मिळालेली आहे. मध्यंतरीच्या काळात हेल्मेटसक्ती मोहीम राबविण्यात आली होती. परंतु, त्यावरून पुणेकरांनी टीकेचा सूर उठविला होता. तरीही हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात असून, पुणेकरांनी हेल्मेट वापरण्याची सवय लावून घ्यावी, अशी अपेक्षाही वाहतूक शाखेच्या वरिष्ठांनी व्यक्त केली आहे.
कायम म्हणतो नियम व कायदा…
मोटार वाहतूक कायद्याच्या कलम 129 अनुसार दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे कायदेशीर बंधनकारक आहे. तसेच, 2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेदेखील दुचाकीस्वारांनी आयएसआय दर्जाचेच हेल्मेट वापरण्याची सक्ती केलेली आहे. 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेदेखील दुचाकी बनविणार्या कंपन्यांनीच दुचाकी विकतानाच हेल्मेटदेखील विकावे, अशी सक्ती केलेली आहे. या सर्व नियमांची अमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे. तरीही पुणेकरांना हेल्मेट वापरणे म्हणजे मोठी त्रासदीच वाटते, याबद्दल वाहतूक सुरक्षा विशेषतज्ज्ञदेखील चिंता व्यक्त करत आहेत. तूर्त तरी वाहतूक पोलिस हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांना समज देऊन व 100 रुपये दंड आकारून सोडून देत आहेत. परंतु, यापुढे कठोर कारवाई केल्याशिवाय पुणेकरांना हेल्मेट वापरण्यासंबंधी शिस्त लागणार नाही, अशी माहितीही सुरक्षा विशेषतज्ज्ञांनी दिली आहे.