The interim government in the state will collapse anytime : Aditya Thackeray पाचोरा : शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार नव्हे तर गद्दार असून त्यांनी माणुसकीसोबत गद्दारी केली आहे. प्रत्येक माणसाला सत्य कळायला हवे. 40 लोकांचा राजकीय जन्म आणि ओळख उद्धव ठाकरेंनी मिळवून दिली. जनतेच्या बळावर हे निवडून आले. 50 खोके घेऊन ते ओक्केमध्ये जाण्याचा विचार करीत होते मात्र हे आमदार हिंदुत्वासाठी गेलेले नाही, फंडासाठी, मंत्री पदासाठी हे गेले नाहीत तर केवळ एक-दोन लोकांच्या राक्षसी हेतूसाठी ते गेले. 40 निर्लज्ज लोक खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर हे गद्दार टेबलावर चढून बारमध्ये नाचले मात्र तुम्ही लिहून ठेवा राज्यातील सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असून हे तात्पुरते सरकार आहे तुम्ही लिहून घ्या, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाचोर्यातील सभेत लगावला.
पुन्हा शिवसेनेचेच येणार सरकार
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, सरकार जाण्याचे मला बिलकुल दुःख नाही. सरकार येते जाते. तुम्ही पुन्हा सरकार आणणार याचा मला विश्वास आहे. जो महाराष्ट्र आपण पुढे नेत होतो तो महाराष्ट्र ते मागे आणण्याचा प्रयत्न करतील. रायगडाला आपण 600 कोटी दिले हा आपला पहिला निर्णय होता. उद्धव साहेबांनी जे वचन दिले ते त्यांनी पाळले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा आपला शेवटचा निर्णय होता. आपण सर्व चांगले निर्णय घेतले. शेतकरी, महिला आणि सर्व समाजाचा विचार केला. शिवसेनेला एकटे पाडण्याचा हा कट आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा हा कट आहे. आपल्याला सर्वांना एकत्र राहायचे आहे. शिवसेनेला पुढे न्यायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
यांच्यावर नेहमीच गद्दारीचा शिक्का कायम राहणार
ठाकरे पुढे म्हणाले कि, गेली अडीच वर्षे महाराष्ट्राचा हा सुवर्णकाळ होता. कुठेही वाद झाला नाही, जातीपातीचे राजकारण आपण केला नाही. 40 गद्दार गावभर सांगतात आम्ही उठाव केला, क्रांती केली पण त्यासाठी हिंमत लागते ते पळून गेले. ते गद्दार होते आणि गद्दारच राहणार. गद्दार पळून कुठे गेले आणि काय आणि काय पहिले ते सर्वांना माहिती आहे. तिथे जाऊन ते ओक्केमध्ये फिरत होते. ते 40 गद्दार तिथे स्वतःला शिवसैनिक म्हणवत होते तेव्हा त्यांना तेथील आसामची पूरस्थिती दिसली नाही. निर्लज्ज 40 लोक मज्जा करीत होते. सोशल मीडियात त्यांच्या क्लीप व्हायरल होत होत्या. ते खरे शिवसैनिक असते तर हॉटेलमध्ये मज्जा करण्यापेक्षा पाण्यात उतरून मदतीला धावले असते, असे ते म्हणाले.
लायकी शिल्लक असेल तर राजीनामा द्या
आदित्य ठाकरे यांनी, आपल्याकडे त्यांना चांगली खाती मिळाली होती परंतु आताच्या सरकारमध्ये त्यांना स्वतःची लायकी कळली आहे. तुम्ही आहे तिथे सुखी रहा. गद्दार म्हणून तिथे राहायचे असेल तर सुखी राहा परंतु थोडी जरी लायकी शिल्लक राहिली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. एकदा होऊन जाऊद्या 40 मतदार संघात पाहून घेऊ. ज्यांना शिवसेनेत परत यायचे आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.