नवि दिल्ली। तिहेरी तलाकची प्रथा म्हणजे मुस्लीम महिलांना जिवंत दफन करण्याचा प्रकार असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री अरिफ मोहम्मद खान यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केले. तिहेरी तलाक ही प्रथा म्हणजे इस्लामी कायद्याचे उल्लंघन आहे असे गृहीत धरण्याची नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले.
शहाबानो प्रकरणावरून राजीव गांधी सरकारमधून बाहेर पडणारे अरिफ मोहम्मद खान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पीठासमोर स्पष्ट केले की, इस्लामपूर्व सौदी अरेबियात मुलींना जिवंत दफन केले जात होते, तिहेरी तलाक ही प्रथा म्हणजे त्याचीच आधुनिक पुनरावृत्ती आहे. अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही त्यांनी टीका केली. लॉ बोर्डाने इस्लाम कायदा खालच्या पातळीवर नेला आहे, असेही ते म्हणाले.