हे राम!

0

उठता, बसता बौद्धिकतेचे धडे देणार्‍या, तिन्ही काळ बोधामृत पाजणार्‍या आणि स्वच्छ आचार-विचाराचे स्वत:लाच प्रशस्तीपत्र देणार्‍या भाजपाचा खरा चेहरा किती भयावह आहे याचे दर्शन आता जनतेला होत आहे. जिल्हा पातळीवरील पुढार्‍यापासून पक्षाच्या अध्यक्षांपर्यंत एका माळेचे मणी आहेत. या माळेत आणखी एक मणी वाढला आहे आणि तो म्हणजे राम कदम! हा गृहस्थ हभप आहे. मात्र साधू-संतांच्या विचाराऐवजी ‘बायका-पोरी’ याचविचाराने त्यांचे डोके भरलेले आहे. यामुळेच काल गरळ बाहेर आली. स्वत:च्या दहीहंडी कार्यक्रमात जमलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या झुंडीला मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘तुम्ही कोणत्याही कामासाठी मला भेटू शकता. साहेब, मी तिला प्रपोज केले; पण ती मला नाही म्हणते. प्लिज मदत करा. मी शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन की, तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या . आई-वडील म्हणाले की, ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा.’ अरे, हा कसला राम? हा तर रावणच! नाम राम आणि और बगल में छोरी! राम मंदिर उभारायला निघालेल्या भाजपला या थोतांड हभप राममुळे ‘हे राम!’ म्हणायची वेळ आली नाही म्हणजे मिळविली.

रामचंद्र शिवाजी कदम. जन्म लातूर. भाजपचे घाटकोपर आमदार. राजकारणात येण्यापूर्वी हभप म्हणून गावोगावी प्रवचन देण्याचे काम. मात्र, मागील पंचवार्षिकमध्ये मनसेची उमेदवारी मिळाली आणि आमदार पदाची संधी मिळाली. मात्र, 8 नोव्हेंबर 2009ला शपथविधी सोहळ्या दिवशीच त्यांना निलंबीत केले. कारण समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी शपथ घेत असताना त्यांनी ती मराठीतूनच घ्यावी, असा ठेका धरला आणि आझमी ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांच्या अंगावर धावून जात, त्यांना चोप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. याबद्दल तीन वर्षांसाठी निलंबन झाले, मात्र वर्षभरात ते मागेही घेण्यात आले. या घटनेमुळे नवा पक्ष, नवा आमदार, मराठी प्रेम, एका मुस्लिमाला मारले…अशा बेगडीपणातून जोरदार टाळ्या वाजल्या. अवघ्या मिनिटभराच्या या कामगिरीने राम कदम यांना देशात प्रसिद्धी मिळाली. महाराष्ट्रात तर एकदम उदोउदोच झाला. ही हवा त्यांच्या डोक्यात गेली. नंतर 19 मार्च 2013 रोजी पोलीस उपनिरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधान भवनाच्या लॉबीत मारहाण केल्याचा गुन्हा मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी 20 मार्च ते 31 डिसेंबर 2013 पर्यंत त्यांना निलंबित केले. मग 21 मार्चला मुंबई पोलिसांपुढे शरणागती पत्करली. सत्र न्यायालयाने त्यांना 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली. ही मुदत संपताच 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी दिली. इथून पुढे मग हळूहळू या हभपचा स्वभाव व वर्तन लक्षात येवू लागले. 2014च्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मनसेपेक्षा भाजप जवळचा वाटला, कारण स्वत:सारखे अनेक मणी या पक्षात आहेत. भाजपालाही बोलका पोपट हवा होता. प्रवक्ता केले. मग दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अनेक चर्चांमध्ये पक्षाची बाजू मांडताना दिसू लागले. मात्र, हळूहळू पक्षातील घाणीचे समर्थन करायचे हेच समजेना. यातूनच अनेकदा बोलताना ततपप होवू लागली. त्यामुळे पक्षानेच टीव्हीवर पाठविणे थांबविले. यातूनच ते महाराष्ट्राच्या विस्मरणात गेले. मात्र, स्वत:ला डॅशिंग, दयावान, धर्मात्मा, दानशूर आणि कार्यसम्राट आमदार म्हणवून घेणाऱ्या राम कदमांचे पितळ प्रजा फाऊंडेशनने उघडे केले आणि पुन्हा ते चर्चेत आले. या संस्थेने आमदारांचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले. त्यात विधीमंडळाच्या चार अधिवेशनातील आमदारांची कामगिरी लक्षात घेतली होती. या अहवालात काँग्रेसचे अमीन पटेल यांचा पहिला, तर राम कदम यांचा क्रमांक शेवटचा लागला. त्यांच्या मतदारसंघात विकासाची कामे होत नाहीत, असेही या अहवालात नमूद केले. यावर ’पप्पू पुन्हा नापास झाला’ अशा मथळ्याचे हे बॅनर मनसेने संपूर्ण घाटकोपरमध्ये लावले. ’पप्पू कान्ट डान्स साला…गोविंदा आला रे आला…’ अशी टर बॅनरव्दारे उडवण्यात आली होती. आता या कदमांना झाली तेवढी शोभा मंजूर नव्हती की काय कोणास ठावूक? कारण मंगळवारी दहीहंडी कार्यक्रमात ‘मुलीचा विरोध असला, तरी तिला पळवून आणून तुम्हाला ती देणार’ असे बरळले….आता संतप्त लोक घाणीने भरलेली त्यांच्या डोक्याची हंडी फोडत आहेत.
मात्र, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यामध्ये राम कदम हे पहिलेच आहेत, असे नाही. त्यांच्यापूर्वी अनेक भाजप नेत्यांनी परिसीमा गाठली आहे.प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना वादग्रस्त वक्तव्याचे महामेरु म्हणावे लागेल. ‘राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात साले’, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. याशिवाय असंसदीय भाषेचा वापरही केला होता. यावर वरताण म्हणजे नोटबंदीच्या काळात जाहीर सभेत लोकांना ते म्हणाले, ‘तुमच्याकडे नोटा असतील, तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो. आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?’. तसेच एका मतदारसंघांच्या प्रचारसभेत ते म्हणाले होते, ‘मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा’. गेल्या वर्षी विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नींबाबत अपमानजनक वक्तव्य केलं. ‘सीमेवरचा जवान वर्षभर घरी येत नाही, तरीही त्याला मुलगा होतो आणि तो पेढे वाटतो’, असे म्हणाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले होते, ‘आधी गुंडांना निवडून आणू. मग त्यांना सुधारू. वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील, तर त्यांचासाठी ही सुधारण्याची संधी आहे’. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचीही जीभ घसरली होती. सप्टेंबर 2015मध्ये पुण्यातील एका महाविद्यालयीन कार्यक्रमात मुलांसमोर ते म्हणाले होते, ’तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता, त्या आम्हीपण रात्री पाहतो. आम्ही पिकलेले पान असलो, तरी आमचे हिरवे देठ आहेत’. ‘आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते’, असे वादग्रस्त विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी नाशिकमध्ये चित्पावन ब्राम्हण संघाच्या परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात केले होते. नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने फेब्रुवारीत 2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका फोन संभाषणात अपशब्द वापरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. हे सारे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही 2016मध्ये रत्नागिरीतील नाणीजच्या नरेंद्र महाराजांच्या वाढदिवसानिमित्त भान सुटले होते. ते म्हणाले, ‘जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते, तेंव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणण्याचे काम करते’ एकूण काय तर मुख्यमंत्र्यांसह जबाबदार मंत्रीही बेताल झाल्यामुळे कदमांवर कारवाई होणार नाही, हे ढळढळीत सत्य आहे. ‘कोठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा’ असे निवडणुकीपूर्वी बेंबीच्या देठापासून ओरडणार्‍या भाजपाला येत्या निवडणुकीत अशा वाचाळवीरांमुळे ‘हे राम!’ म्हणायची वेळ पक्षावर येवू नये, म्हणजे मिळविली.