भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा सरकारवर घणाघात
मुंबई : अल्पसंख्याक विभागाचे सरकारकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहे की काय असा प्रश्न पडतो असे म्हणत त्यांच्यासाठी निधी द्यायचा नसेल तर त्यांना किमान आशेवर तर ठेवू नका असा हल्ला खडसे यांनी चढवला. अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना खडसे यांनी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आणि तालुक्यांमध्ये वसतिगृहाची मागणी करत सरकारच्या जलयुक्त शिवार आणि पर्यटन विभागावर चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी वृद्ध कलावंतांना त्यांचे मानधन महिन्याच्या महिन्याला देण्याची व मानधनात वाढ करण्याची मागणी केली.
अल्पसंख्यांकासाठी सरकारच्या भावना काय?
अल्पसंख्याक विभागाच्या संदभार्त गेल्या तीन वर्षांपूर्वी पहिले पॉलिटेक्निक माझ्या मतदारसंघात करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी जागा दिली, टेंडर काढले मात्र निधीची तरतूद नसल्यामुळे तंत्र विद्यालय होऊ शकले नाही, असा आरोप खडसे यांनी केला. या निधीसाठी मी सगळीकडे फिरलो मात्र निधी मिळत नाही. यांच्या मनात अल्पसंख्याकांसाठी काय भावना आहेत हे ओळखू येतेय, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्यासाठी निधी द्यायचा नसेल तर तसे स्पष्ट सांगा मात्र उगाच आशेवर ठेवायचं बंद करा असेही खडसे यावेळी म्हणाले. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपसाठी व्यवस्था केली मात्र किती विद्यार्थ्यांना दिली? असा सवाल करत १० टक्के विद्यार्थ्यांनाही मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना तातडीने स्कॉलरशिप द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
जलयुक्तची कामे बंद; भ्रष्टाचार होतोय
सरकारच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेची कामे निधी अभावी बंद पडली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांना पैसे उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले जाते मात्र टेक्निकल अटी अशा घातल्या प्रस्ताव अडकून पडले आहेत. जलसंधारण किती कामे सुरु आणि किती कामे झाली? असा सवालही खडसे यांनी केला. पहिल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के हि कामे सुरु नसल्याचे ते यावेळी म्हणाले. अत्यंत चांगला गाजावाजा करीत सुरु केलेली अत्यंत चांगली योजना बंद पडत आहे असे खडसे यांनी सांगितले. या योजनेमुळे किती गावांची दुष्काळातून मुक्तता झाली? असा सवाल करत योजनेमध्ये अनेक ठिकाणी गैरव्यवहार झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. खालच्या स्तरावर अमलबजावणी नीट नसल्याचे सांगत योजनेला गती देण्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यटन विभाग कमी पडतोय
राज्यात पर्यटन विभागाणे पॉलिसी चेंज करण्याची आवश्यकता असल्याचे खडसे म्हणाले. राज्यामध्ये अजूनही अनेक क्षेत्राचा विकास केला तर बाहेरचे पर्यटक आकर्षित करू शकतो असे त्यांनी सांगितले. शेजारच्या गुजरात, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात पर्यटनाबाबत मोठी जाहिरातबाजी करून पर्यटकांना आकर्षित केले जाते. मात्र आपले राज्य सरकारचा पर्यटन विभाग कमी पडतोय असे चित्र आहे. आपल्याकडे पर्यटनाचा मोठा क्षेत्र असूनही काहीच ठिकाणीपर्यटक येतात, असे खडसे म्हणाले. पर्यटनाच्या ठिकानी जाण्याचे रस्ते चांगले असावेत, स्वच्छता असावी असे सांगत शौचालय आणि राहण्यासाठी चांगल्या व्यवस्था नसल्याचे ते म्हणाले. पर्यटन विभागामध्ये नवीन धोरणात्मक व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे खडसे म्हणाले.
मराठीसाठी आपण सभागृह बंद पाडली
राज्यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असे सांगत आपणच विरोधी पक्षात असताना या मागणीसाठी अनेकदा सभागृह बंद पाडले होते. आता आपले सरकार आहे, नेमकी अडचण काय? असा सवाल खडसे यांनी केला. हि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट नाही असेही खडसे म्हणाले. याचा पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे सांगत मराठीचा प्रचार व्हावा , वापर व्हावा यासाठी आग्रही असणे गरजचे आहे. दुर्दैवाने वाचन संस्कृती नष्ट होत चालली असल्याचे सांगत जुने साहित्य संग्रहित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हस्तलिखित, ऐतिहासिक दस्तावेज मराठी भाषेतील साहित्य जपून ठेवून पुढच्या पिढीला उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच राज्य सरकारने वाचनालयासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणीही खडसे यांनी केली.