शहादा । नोटबंदीने आधीच शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता जी.एस.टी. नावाचे भूत शेतकर्याचा मानगुटीवर बसले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे सरकार उद्योगपतींचे आहे; शेतकर्यांचे नाही, असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केला. एका वर्षात शेतकर्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शेतकर्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतकरी सन्मान अभियान सुरु आहे. त्याअंतर्गत बामखेडा व वडाळी (ता. शहादा) येथे झालेल्या सभेत श्री. शेट्टी बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवक प्रदेशाध्यक्ष हेमराज वळगुडे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घन:श्याम चौधरी, प्रकाश पोकळे, महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे, माणिकराव कदम आदी उपस्थित होते. यावेळी वडाळीचे माजी सरपंच दीपक पाटील, अभय गोसावी, दीपक पटेल, रवींद्र पाटील, खैरवा येथील डॉ.उमेश पाटील, जगतसिंग गिरासे, धनराज चव्हाण, बंडूगीर गोसावी, किरण पाटील, डॉ.चंद्रकांत चौधरी, नरोत्तम चौधरी, अशोक चौधरी आदींचीही हजेरी होती.
बंड करून प्रस्थापितांची थडगी बांधू
यावेळी श्री. शेट्टी म्हणाले, आज शेतकर्याची परिस्थिती मरणासन्न झाली आहे. शेतकर्याला आधार दिला जात नाही. परंतु देशाचा शेतकरी हा पळपुटा नाही. तो स्वाभिमानी आहे. बंड करून प्रस्थापितांची थडगी बांधल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय गोसावी यांनी तर सूत्रसंचालन सुनील माळी यांनी केले.
हिंगणी येथे फलक अनावरण
दरम्यान हिंगणी (ता. शहादा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे फलक अनावरण खासदार राजू शेट्टी यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, घन:श्याम चौधरी, युवा जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, सुनील पाटील, शाखा अध्यक्ष मणिलाल पाटील, उपाध्यक्ष प्रकाश मराठे, सरचिटणीस विठ्ठल पारधी, सदस्य कैलास भिल, बापू पवार, आसाराम भिल, बबन कोळी, दीपक पाटील, गौरव पाटील, ललित पाटील, पुरुषोत्तम पाटील, विनोद पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.